नक्षल्यांच्या हालचालींवर ड्रोनची करडी नजर, सीमेवर जवान अलर्ट मोडवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 02:45 PM2024-11-13T14:45:54+5:302024-11-13T14:49:31+5:30

१७ हजार सुरक्षारक्षकः निर्भीड वातावरणात मतदान होण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न

Drones keep a watchful eye on Naxalites' movements, border jawans on alert mode | नक्षल्यांच्या हालचालींवर ड्रोनची करडी नजर, सीमेवर जवान अलर्ट मोडवर

Drones keep a watchful eye on Naxalites' movements, border jawans on alert mode

लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली :
नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील गडचिरोलीत विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलिस दलातील सी-६० हे विशेष पथक सज्ज झाले आहे. एकीकडे प्रभावी नक्षलविरोधी मोहीम, दुसरीकडे आत्मसमर्पण यामुळे नक्षल चळवळीला एकामागून एक धक्के बसत आहेत. मात्र, निवडणूक काळात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी नक्षल्यांच्या प्रत्येक हालचालीवर अत्याधुनिक ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. 


लोकसभा निवडणुकीत एका मतदान केंद्रावरील हल्ल्याचा प्रयत्न हा एकमेव अपवादवगळता शांततेत मतदान झाले. निवडणुकीपूर्वीच नक्षल्यांचे मनसुबे उधळून लावण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले होते. 


आता विधानसभा निवडणुकाही शांततेत व सुरक्षित वातावरणात व्हाव्यात, याकरिता पोलिस दलाकडून व्यूहरचना आखली जात आहे. छत्तीसगड व तेलंगणा सीमेवर १४ ठिकाणी आंतरराज्य तपासणी नाके सुरू केली असून, परराज्यातून येणाऱ्या व गडचिरोलीतून तिकडे जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. पोलिसांकडे १३० अत्याधुनिक ड्रोन कॅमेरे असून त्याचा वापर केला जात आहे. जिल्हाभरात १७ हजार सुरक्षा जवानांची कुमक निवडणुकीसाठी तैनात राहणार आहे. कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 


३० जहाल माओवाद्यांनी सन २०२२ पासून आतापर्यंत आत्मसमर्पण केले आहे. हिंसक चळवळीत असलेल्यांचे मनपरिवर्तन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.


आतापर्यंत एकही गुन्हा नाही 
दरम्यान, जिल्हा अतिसंवेदनशील व नक्षलप्रभावित असतानाही सुदैवाने आतापर्यंत एकही अनुचित घटना घडलेली नाही. १५ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. तेव्हापासून आतापर्यंत कायदा - सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल, असा एकही गुन्हा नोंद झालेला नाही. यासाठी पोलिसांचे सुक्ष्म नियोजन कामी आले आहे.


सन २०१९ मध्ये काय घडले होते ? 
आचारसंहिता कालावधीत ७ गुन्हे दाखल झाले होते. नक्षल्यांनी सुरक्षा जवानांवर हल्ला केला होता. यात चौघे जखमी झाले होते. सुरक्षेचा नियमित आढावा 
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. याशिवाय गुप्तचर यंत्रणेकडूनही माहिती घेतली जात आहे. केंद्रीय सुरक्षा दलासह राज्याच्या सुरक्षा यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाञ्चायतन माडचिरोली पोलिसांकडून सतत आढावा घेतला जात आहे.


"लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणूकही सुरक्षित वातावरणात पार पडेल. छत्तीसगड सीमेवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. सी-६० या जवानांमार्फत नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत आहे. जनतेने कोणाच्याही दबावाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजवावा." 
- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक

Web Title: Drones keep a watchful eye on Naxalites' movements, border jawans on alert mode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.