जिल्ह्यात यंदा कोरड्या दुष्काळाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 05:00 AM2020-08-01T05:00:00+5:302020-08-01T05:00:52+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प १९८० च्या कायद्यामुळे रखडले आहेत. कृषी विभाग, रोहयो तसेच धडक सिंचन व इतर योजनांमधून जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी शेतात सिंचन विहीर बांधून सिंचन सुविधा केली. मात्र अशा शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात अल्प आहे. येथील ८० टक्के शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. ही शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र यंदा जिल्ह्यात फार कमी पाऊस पडला. जुलै महिना संपूनही मुसळधार पावसाचा पत्ता नाही. शेतातील धानपऱ्हे व झालेली रोवणी करपायला लागली आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचे सावट आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प १९८० च्या कायद्यामुळे रखडले आहेत. कृषी विभाग, रोहयो तसेच धडक सिंचन व इतर योजनांमधून जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी शेतात सिंचन विहीर बांधून सिंचन सुविधा केली. मात्र अशा शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात अल्प आहे. येथील ८० टक्के शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला नाही. यंदा एकदाही पूरपरिस्थिती निर्माण झाली नाही. परिणामी जिल्ह्यातील नदी, नाल्या, तलाव, बोड्या अत्यल्प पाणीसाठा आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकरी, शेतमजुरांचा यावर्षी दोन ते तीन महिन्यांचा रोजगार गेला. परिणामी कृषी क्षेत्रावरही या लॉकडाऊनचा मोठा परिणाम झाला आहे. अशाही परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने स्वत:ला उभे करून खरीप हंगामाची तयारी केली. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही बँकांकडून पीक कर्ज घेऊन शेती लागवडीचा खर्च भागविण्यावर भर दिला. मात्र पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी आता प्रचंड हवालदिल झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत धानपीक लागवडीची टक्केवारी ४४.८९ आहे. ही आकडेवारी पºहे, रोवणी व आवत्या मिळून आहे. पाण्याअभावी रोवणीचे काम ठप्प पडले आहे.
४३,७०२ हेक्टर क्षेत्रावर धान रोवणी
गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात मिळून एकूण आतापर्यंत ४३ हजार ७०२ हेक्टर क्षेत्रावर धानपिकाची रोवणी झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात धानपिकाचे एकूण क्षेत्र १ लाख ६८ हजार ४२० इतके आहे. यावर्षी अपेक्षित पाऊस न बरसल्याने धानपीक रोवणीचे काम बरेच मागे आहे. जिल्ह्यात ३१ हजार ८९८ हेक्टर क्षेत्रावर आवत्या आहे. कृषी विभागाच्या खरीप हंगाम पीक पेरणी अहवालानुसार रोवणी, पऱ्हे, आवत्या मिळून धान लागवडीची एकूण टक्केवारी ४४.८९ आहे. ८६० हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. धान, मका, तूर, तीळ, सोयाबीन, कापूस यासह भाजीपाला तसेच कडधान्य व तृणधान्य मिळून सर्व पिकांची एकूण लागवडीची टक्केवारी ५१.९३ इतकी आहे. दरवर्षी जुलै महिन्याच्या अखेरीस धानपीक रोवणीची टक्केवारी ६० टक्क्यापेक्षा अधिक राहत होती. मात्र यंदा पावसाअभावी धानपीक रोवणीचे काम मागे पडले आहे.
देलनवाडी परिसरात पऱ्हे वाळले
आरमोरी तालुक्याच्या मानापूर, देलनवाडी परिसरात गेल्या महिनाभरापासून जोरदार पावसाचा पत्ता नाही. या भागात ज्या शेतकऱ्यांकडे छोट्या-मोठ्या सिंचन सुविधा आहेत, त्यांनी कसेबसे आपल्या शेतात रोवणीचे काम आटोपून घेतले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, बोअर तसेच नदी, नाला नाही, अशा शेतकऱ्यांचे रोवणीचे काम थांबले आहे. हे शेतकरी चातक पक्षासारखे आकाशाकडे टक लावून पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. आज ना उद्या मुसळधार पाऊस बरसेल, अशी आशा या भागातील शेतकऱ्यांना आहे. काही शेतजमिनीतील धानाचे पऱ्हे वाळत आहेत. एका शेतकऱ्यांनी उद्या नक्की पाऊस येईल, असा अंदाज बांधून आपल्या शेतात पºहे खोदून ठेवले. मात्र पाऊस न आल्याने खोदलेल्या पऱ्ह्याच्या पेंड्या वाळून गेल्या. या भागातील तलाव, बोड्या कोरडेच आहेत.
रोवणीसाठी दिना धरणाचे पाणी सोडणार
चामोर्शी तालुक्यात पाऊस बरसत असल्याने धानपीक रोवणीची कामे ठप्प पडली आहेत. दरम्यान शेतकऱ्यांची ही कामे पार पाडण्यासाठी दिना धरणातील पाणी १ ऑगस्ट रोजी शनिवारी सोडण्यात येणार आहे. आ.डॉ.देवराव होळी यांच्या हस्ते जलपूजन करून धरणातील पाणी शेतीसाठी सोडण्यात येणार आहे. यासंदर्भात चामोर्शी येथे बैठक पार पडली. यावेळी तहसीलदार संजय गंगथडे, कार्यकारी अभियंता मेश्राम, तालुका अभियंता घोलपे आदी उपस्थित होते. याशिवाय भाजपचे पदाधिकारी साईनाथ बुरांडे, दिलीप चलाख, सुरेश शहा, त्रियुगी दुबे महाराज, रितेश पालारपवार आदी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या सद्य:स्थितीतील समस्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.