जिल्ह्यातील १५६ गावांमध्येच दुष्काळसदृश परिस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:34 AM2020-12-31T04:34:09+5:302020-12-31T04:34:09+5:30
गडचिरोली : अवकाळी पाऊस, पूरपरिस्थिती आणि मावा-तुडतुड्यासारखा रोग यामुळे यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न झालेले नाही. तरीही जिल्ह्यातील १३३७ ...
गडचिरोली : अवकाळी पाऊस, पूरपरिस्थिती आणि मावा-तुडतुड्यासारखा रोग यामुळे यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न झालेले नाही. तरीही जिल्ह्यातील १३३७ गावांची पैसेवारी ५० टक्केपेक्षा जास्त असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने जाहीर केला. एकूण खरीप पिकांच्या गावांपैकी १५६ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे. त्यामुळे त्याच गावांना दृष्काळसदृश परिस्थितीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. ही गावे आरमोरी आणि कोरची तालुक्यातील आहेत.
खरीप पिकांच्या वेळोवेळी केलेल्या पीक पाहणी अहवालाच्या आधारे प्रशासनाने सन २०२०-२१ या वर्षाची खरीप पिकाची अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. जिल्ह्याची अंतिम सरासरी पैसेवारी ही ६३ आहे. जिल्ह्यात एकूण १६८८ गावे आहेत. त्यापैकी खरीप पिकांची गावे १५४४ आहेत. एकूण पिकाखालील क्षेत्राच्या दोन तृतीयांश क्षेत्रामध्ये खरीप पिकाची पेरणी केलेल्या रबी गावांची संख्या १० आहे. त्यापैकी पीक नसलेली गावे ६१ आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात खरीप पीक असलेल्या एकूण १४९३ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली. त्यात ५० पैशाच्या आतील गावे १५६, तर ५० पैशाच्या वर पैसेवारी असलेल्या गावांची संख्या १३३७ आहे.
वैनगंगा नदीच्या पुरामुळे देसाईगंज, गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातील काही गावांमधील पीक खरडून गेले. पण त्या गावांमध्ये पैसेवारी जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
(बॉक्स)
तालुकानिहाय अशी आहे अंतिम पैसेवारी
- गडचिरोली-५९, धानोरा-६७, चामोर्शी-५९, मुलेचरा-७४, देसाईगंज-५७, आरमोरी-६७, कुरखेडा-६८, कोरची-४६, अहेरी-७०, एटापल्ली-६५, भामरागड-५७, सिरोंचा-७१ पैसे याप्रमाणे पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली.
- ५० पैसे व त्यापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या १५६ गावांमध्ये आरमोरी तालुक्यातील २२ आणि कोरची तालुक्यातील १२८ गावांचा समावेश आहे. कोरची तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ यापुर्वीच जाहीर करण्यात आला आहे.