धबधब्याच्या पाण्यात बुडून डॉक्टरचा मृत्यू
By Admin | Published: April 16, 2017 08:47 PM2017-04-16T20:47:13+5:302017-04-16T20:47:13+5:30
डॉ. आर. एल. जामी यांचा बिनागुंडा येथील धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
ऑनलाइन लोकमत
भामरागड (गडचिरोली), दि. 16 - नागालँड राज्यातील मूळचे रहिवासी असलेले व भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. आर. एल. जामी यांचा बिनागुंडा येथील धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
डॉ. आर. एल. जामी हे २० मार्च २०१६ रोजी बंदपत्रित वैद्यकीय अधिकारी म्हणून भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात रुजू झाले होते. त्यांचा कंत्राट १९ मार्च २०१७ ला संपला होता. सेवेला मुदतवाढ मिळावी यासाठी त्यांनी आयुक्तांकडे अर्ज केला होता. त्यांचा अर्ज विचाराधीन होता. या कालावधीत ते भामरागड येथील रुग्णालयात सेवा देत होते. १६ एप्रिल रोजी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आले होते. भामरागड तालुक्यातील लाहेरी परिसरातील बिनागुंडा येथील राजीरप्पी धबधबा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. सदर धबधबा पाहण्यासाठी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी व भामरागड येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी राजीरप्पा धबधबा पाहण्यासाठी गेले.
धबधब्याच्या पाण्यात सर्वजण अंघोळ करीत असतानाच डॉ. आर. एल. जामी खोल पाण्यात गेले व त्यांचा बुडून मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. पाण्यात बुडून मृत्यू असल्याची माहिती असली तरी, नेमका कसा मृत्यू झाला, हे अजूनही संशयास्पद आहे. याबाबतची तक्रार लाहेरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली असून लाहेरी पोलीस सखोल तपास करीत आहेत.
वृत्त लिहीपर्यंत त्यांचा मृतदेह भामरागड येथील ग्रामीण रूग्णालयात आणायचाच होता. सेवेला मुदतवाढ मिळण्याचा अर्ज विचाराधीन असतानाही ते भामरागड येथे अत्यंत चांगली सेवा देत होते. नागालँडचे असल्याने थोडीफार भाषेची समस्या निर्माण होत असली तरी आदिवासींच्या हावभावावरून त्यांचे आरोग्य समजून घेण्याची कला त्यांनी आत्मसात केली होती. ग्रामीण रूग्णालयात मृतदेह आणला जाणार आहे, ही माहिती मिळताच रूग्णालयाच्या परिसरात सभोवतालच्या गावातील हजारो नागरिक गोळा होऊन होते. परराज्यातील डॉक्टर असले तरी मुख्यालयी राहून ते अविरत सेवा देत होते. ते अविवाहित होते. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या प्रशासनाने डॉ. जामी यांच्या मृत्यूबाबतची माहिती आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी व त्यांच्या नागालँड येथील नातेवाईकांना कळविली आहे.