लाखावर दमा रूग्णांनी घेतले औषध
By admin | Published: June 9, 2017 01:03 AM2017-06-09T01:03:22+5:302017-06-09T01:03:22+5:30
तालुक्यातील कोकडी येथे महाराष्ट्रासह राजस्थान, छत्तीसगड तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून
ग्रामस्थांचे संपूर्ण सहकार्य : कोकडी गावाला आले जत्रेचे स्वरूप; चोख पोलीस बंदोबस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
तुळशी/देसाईगंज : तालुक्यातील कोकडी येथे महाराष्ट्रासह राजस्थान, छत्तीसगड तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दमा रूग्णांनी मृग नक्षत्राच्या पर्वावर गुरूवारी वैद्यराज प्रल्हाद कावळे यांच्याकडून दमा रोगाचे औषध घेतले. एक लाखावर दमा रूग्ण येथे जमल्यामुळे कोकडी गावाला गुरूवारी जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
कोकडी येथील वैद्यराज प्रल्हाद कावळे हे मागील ३५ वर्षांपासून दरवर्षी मृगनक्षत्राच्या पहिल्या दिवशी लाखो दमा रूग्णांना नि:शुल्क औषध वितरित करतात. यावर्षी सुध्दा सदर सेवाभावी उपक्रमासाठी वैद्यराज प्रल्हाद कावळे यांना कोकडीवासीयांनी संपूर्ण सहकार्य केले. सकाळी ७ वाजतापासून वैद्यराज कावळे यांनी दमा रूग्णांना विशिष्ट प्रकारच्या छोट्या मासोळीतून औषध देण्यास प्रारंभ केला. सदर उपक्रम सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालला. सतत तीन वर्ष ही दमा रोगाची औषध घेतल्यानंतर दमा रोग पूर्णत: बरा झाल्याचा अनुभव अनेकांनी घेतला. भ्रमणध्वनी तसेच फेसबूक, व्हाट्सअॅप यासारख्या प्रसार माध्यमामुळे वैद्यराज कावळे यांच्या या उपक्रमाची राज्यभरात तसेच राज्याच्या बाहेरसुध्दा प्रसिध्दी झाल्याने गेल्या दोन-तीन वर्षात त्यांच्याकडून औषध घेणाऱ्या दमा रूग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. ८ जून रोजी गुरूवारला कोकडी येथे लाखो दमा रूग्ण दाखल झाल्याने कोकडी गाव दमा रूग्णांच्या गर्दीने कुंभमेळ्यासारखे फुलून गेले होते.
विशेष म्हणजे, दोन दिवसापूर्वीपासून दमा औषध घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून दमा रूग्णाचे जत्थे दाखल झाले. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीनेही बुधवारच्या रात्रीपासूनच गावात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महामंडळाची बससेवाही दमा रूग्णांसाठी गावापर्यंत करण्यात आली होती.
पाणपोईची व्यवस्था
रूग्णांची प्रचंड संख्या व पाण्याची गरज लक्षात घेऊन औषधी वाटपादरम्यान रूग्णांची गैरसोय होऊ नये याकरिता कृषी उत्पन्न बाजार समिती, तिरूपती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, कृषी सहायक सुधाकर कोहळे, भारत स्वाभिमान, पतंजली योग समिती कोकडी व सेवाभावी व्यक्तींतर्फे कोकडी येथे अनेक ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली होती.
केळीतून दिले अनेकांना औषध
गणी भुरभुसा या बारीक मासोळीचे उत्पादन व प्रजनन दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे अनेकांनी केळीतून हे औषध घेतले. शाकाहारी रुग्णांसाठी ही खास सोय करण्यात आली होती. त्यासाठी काही लोकांनी केळी उपलब्ध करून देऊन या उपक्रमात हातभार लावला.
उपक्रमाला अनेकांचे सहकार्य
वैद्यराज प्रल्हाद कावळे हे दरवर्षी दमा रूग्णांना ‘गणी भुरभुसा’ या बारीक मासोळीतून आयुर्वेदीक औषध देतात. सदर औषध वाटपाचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील व परिसरातील भोई समाज बांधवांनी विशेष सहकार्य केल्याचे दिसून आले. दमा रूग्णांना औषधीसाठी साहित्याचा तुटवडा जाणवू नये, यासाठी अनेकांनी आपापल्या परीने सहकार्य करून या समाजकार्यात हातभार लावला.
आमदारांच्या हस्ते औषध वाटपाचा शुभारंभ
आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते प्रत्यक्ष दमा रूग्णाला औषध देऊन या सेवाभावी उपक्रमाचा शुभारंभ सकाळी ७ वाजता करण्यात आला. याप्रसंगी देसाईगंज पं.स.चे सभापती मोहन गायकवाड, उपसभापती गोपाल उईके, माजी पं.स. सभापती परसराम टिकले, दिगांबर मेश्राम, कोकडीचे सरपंच मन्साराम बुध्दे, उपसरपंच सुधीर वाढई, जि.प. सदस्य रोशनी पारधी, मुख्याध्यापक नेवारे यांच्यासह ग्रा.पं. सदस्य व तंटामुक्त समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर वैद्यराज कावळे यांनी औषधी वितरण सुरू केले.