मद्यधुंद कारचालकाने पाच जणांना उडविले, नागरिकांनी दिला कारचालकास चोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 10:20 PM2018-06-13T22:20:00+5:302018-06-13T22:20:00+5:30
मद्यधुंद कारचालकाने चुकीच्या बाजूने कार चालवून पाच ते सहा जणांना उडविल्याची घटना बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास येथील धानोरा मार्गावरील गुरूदेव हॉटेलजवळ घडली.
गडचिरोली : मद्यधुंद कारचालकाने चुकीच्या बाजूने कार चालवून पाच ते सहा जणांना उडविल्याची घटना बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास येथील धानोरा मार्गावरील गुरूदेव हॉटेलजवळ घडली. या अपघातात पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. ट्रक मध्येच आल्यामुळे पुढील अनर्थ टळल्याचे बोलले जात असून कारचालकास नागरिकांनी चांगलाच चोप दिला.
एमएच-३३-व्ही-११०९ क्रमांकाची कार घेऊन कारचालक पेट्रोल पंपापासून भरधाव वेगाने निघाल्यानंतर रस्त्यात मिळेल त्याला उडवित होता. बसस्थानकानजीक एमएच-३४-एएस-०३३६ क्रमांकाच्या दुचाकीस धडक दिली. या धडकेत दुचाकी पूर्णत: क्षतिग्रस्त झाली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. यानंतर रस्त्यात आलेल्या अनेक जणांना उडवित जात असताना सीजी-०४-एमसी-५५०७ क्रमांकाचा ट्रक समोर आल्याने ट्रकला धडक देऊन कार थांबली. यामुळे पुढील अनर्थ टळला.
कारचालक कारमधून उतरून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर नागरिकांच्या तावडीतून आरोपी चालकास सोडवून रुग्णवाहिकेने रुग्णालयात पाठविले. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक गोळा झाल्याने वाहतूक खोळंबली होती. या अपघातात काही जण गंभीर जखमी झाले असून, प्रकृती धोकादायक असल्याची माहिती आहे. गडचिरोलीचे ठाणेदार दीपरत्न गायकवाड यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळली.