दारुबंदी असलेल्या गडचिरोलीत तलाठी तर्रर्र... खुर्चीतून कोसळले, शेतकऱ्यांनी सावरले
By संजय तिपाले | Published: September 8, 2023 12:42 PM2023-09-08T12:42:53+5:302023-09-08T12:43:39+5:30
व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल
गडचिरोली : जिल्ह्यात दारुबंदी आहे, पण मद्यपान करण्याचे प्रमाण काही कमी नाही. यातच काही कार्यालयात शासकीय अधिकारीच मद्यपान करुन कर्तव्य बजावत असल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे. कुरखेडा तालुक्यातील एक तलाठी दारुच्या तर्रर्र नशेत खुर्चीतून कोसळला, त्यास शेतकऱ्यांनी सावरल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली.
किशोर राऊत असे त्या तलाठ्याचे नाव आहे. ते कुरखेडा तालुक्यातील सोनेरांगी येथे सजा क्र.८ मध्ये कार्यरत आहेत. सातबारा व इतर कामांसाठी कार्यालयात गेल्यावर ते मद्यपान केलेल्या स्थितीत आढळतात, अशी तक्रार नागरिकांची होती. त्यातच बुधवारी सोनेरांगी गावातील काही शेतकरी कामानिमित्त कार्यालयात गेले तेव्हा ते दारुच्या नशेत खुर्चीत बसलेले आढळले. यावेळी शेतकऱ्यांनी राऊत यांच्याकडे काही कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याची विनंती केली. मात्र, नशेत असल्याने त्यांना स्वाक्षरी करता आली नाही. यावेळी ते अचानक खुर्चीतून कोसळले. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांना उचलून बाजूच्या खोलीत नेत एका खाटेवर झोपवले. ही चित्रफित सार्वत्रिक झाल्याने खळबळ उडाली आहे.
संबंधित तलाठ्याला नोटीस बजावली आहे. मंडळाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी तेथे उपस्थित शेतकरी तसेच कोतवाल यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. अहवाल येताच पुढील कारवाई केली जाईल.
- राजकुमार धनभाते, तहसीलदार कुरखेडा