शेजारच्या जिल्ह्यात जाईन पण, दारू पिऊनच येईन; तेलंगणा, छत्तीसगडमधून तस्करी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 01:29 PM2023-03-10T13:29:15+5:302023-03-10T13:29:15+5:30
दारूबंदी असलेल्या गडचिरोलीत सर्रास नशेखोरी
गडचिरोली : जिल्हा व्यसनमुक्त राहावा, यासाठी दारूबंदी आहे. पण, चोरीछुपे दारूविक्री सर्रास होत असल्याचे चित्र आहे. नशेच्या आहारी गेलेले लोक परजिल्ह्यात जातात; पण, दारू पिऊनच येतात. छत्तीसगड, तेलंगणा राज्यांतून जिल्ह्यात दारूची बिनबोभाटपणे तस्करी होत असल्याची धक्कादायक माहिती आहे.
अतिदुर्गम असलेल्या गडचिरोलीत दारू विक्रीस परवानगी नाही. मात्र, मोहाची दारू बनवून विक्री करणाऱ्यांची कमी नाही. हा सगळा धंदा स्थानिक यंत्रणेला हाताशी धरून राजरोस सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. दरम्यान, जिल्ह्यात दारूविक्रीविरोधात काम करणाऱ्या सामाजिक संघटनांची संख्या भरमसाट आहे, परंतु याउपरही विक्रेते यंत्रणेला न जुमानता आपले धंदे तेजीत ठेवण्यावर भर देत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
सीमावर्ती भागातील गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांसह तेलंगणा व छत्तीसगड राज्यातूनदेखील दारूची आवक आहे. गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी व देसाईगंज या भागातील हौशी लोक चंद्रपूरमध्ये जाऊन मद्यपान करतात व पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात येतात, अशा तक्रारी आहेत. सीमा भागात दारूविक्रीची दुकाने अधिक असल्याने हे कटू वास्तव असल्याचे सांगितले जाते.
एकच प्याला बेतू शकतो जिवावर
दारूच्या एका प्याल्यासाठी नशेखोर अनेक उपद्व्याप करताना दिसतात. मात्र, अनेकदा बनावट दारू घशाखाली जाण्याची शक्यता असते. यामुळे जिवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दारूसारख्या घातक व्यसनापासून दूर राहणे हितावह आहे.
गांजा, गुटखा अन् खर्राही जोमात
जिल्ह्यात दारूसोबतच गांजा, गुटखा व खर्रा खाण्याचे प्रमाण अधिक आहे. सिगारेट, विडीचेही अनेकांना व्यसन आहे. सिराेंचा तालुक्यात कालबाह्य झालेल्या गूळ व साखरेपासून दारू बनविली जात असल्याचे पोलिसांच्या कारवायांतून अनेकदा समोर आलेले आहे.