आरमोरीत धान रोवणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2017 01:38 AM2017-02-15T01:38:51+5:302017-02-15T01:38:51+5:30

तालुक्यातील धान शेतीला इटियाडोह प्रकल्पाचे पाणी सोडले जाते. त्यामुळे आरमोरी तालुक्यातील अनेक शेतकरी उन्हाळी धान पिकाची लागवड करतात.

Drying of roasted rice | आरमोरीत धान रोवणीला वेग

आरमोरीत धान रोवणीला वेग

Next

५०० हेक्टरवर लागवड : स्थानिक शेतमजुरांना मिळाला रोजगार
आरमोरी : तालुक्यातील धान शेतीला इटियाडोह प्रकल्पाचे पाणी सोडले जाते. त्यामुळे आरमोरी तालुक्यातील अनेक शेतकरी उन्हाळी धान पिकाची लागवड करतात. यावर्षी जवळपास ५०० हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी धान पिकाची लागवड होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आरमोरी तालुक्यातील बहुतांश शेतीला इटियाडोह धरणाच्या माध्यमातून सिंचन होते. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांकडे विहिरीची सुविधा उपलब्ध असल्याने सदर शेतकरी उन्हाळी पिकाचे उत्पादन घेतात. आरमोरी जवळील शिवणी, सायगाव, वघाळा, आरमोरी, अरसोडा, पळसगाव या भागातील शेतकरी विशेषकरून उन्हाळी पिकाचे उत्पादन घेतात. इटियाडोह धरणाचे पाणी अजुनपर्यंत सोडण्यात आले नाही. मात्र उन्हाळी धान पिकाची लागवड करण्याचे आवाहन सिंचन विभागाच्या मार्फतीने करण्यात आले होते. त्यानुसार तालुक्यातील शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्याचा उपयोग करून धानाचे पऱ्हे टाकले आहेत. त्याचबरोबर जमिनीमध्ये ओलावा असल्याने पाणी जास्त लागत नाही. विहिरीच्या पाण्याच्या माध्यमातून चिखलणी व रोवणीच्या कामाला सुरूवात झाली आहे.
आरमोरी तालुक्यात दरवर्षी जवळपास ५०० हेक्टरवर उन्हाळी धान पिकाची लागवड केली जाते. यावर्षीसुद्धा तेवढ्याच क्षेत्रावर धान पिकाची लागवड होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उन्हाळी धानाच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांना जवळपास तीन महिने आणखी रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे मजुरांना रोहयो किंवा इतर काम शोधण्याची गरज राहत नाही. शेतकऱ्यांनाही दुप्पट उत्पादन होण्यास मदत होते. या धानाची विक्री करून खरीपातील धानाची लागवड करीत असल्याने सदर धानाच्या लागवडीकडे दिवसेंदिवस आरमोरी तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरीवर्ग वळत चालला असल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)

 

Web Title: Drying of roasted rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.