कीड नियंत्रणासाठी बदकांचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 12:34 AM2018-09-02T00:34:21+5:302018-09-02T00:34:48+5:30
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जिल्ह्यातील धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांचा सेंद्रीय शेतीकडे कल वाढावा, यासाठी आत्मा विभागाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे.
विष्णू दुनेदार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुळशी : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जिल्ह्यातील धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा सेंद्रीय शेतीकडे कल वाढावा, यासाठी आत्मा विभागाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून देसाईगंज तालुक्याच्या नैनपूर येथील भाग्यश्री सेंद्रीय शेतकरी गटातील शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीची कास धरत एकात्मिक तण व कीड नियंत्रणासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग आपल्या शेतीत केला आहे. या गटातील शेतकरी तण व कीड नियंत्रणासाठी बदकाचा वापर करीत आहेत.
आत्मा अंतर्गत नैनपूर येथे भाग्यश्री सेंद्रीय शेतकरी गट स्थापन करण्यात आला. या गटात एकूण २० शेतकरी सहभागी आहेत. या शेतकऱ्यांनी ४० एकर शेतीमध्ये सेंद्रीय शेतीचा प्रयोग सुरू केला आहे. यासाठी आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनात तालुका तंत्र व्यवस्थापक महेश दोनाडकर कृषी सहायक कल्पना ठाकरे यांच्याकडून मार्गदर्शन मिळत आहे. बदक हा बहुउद्देशीय पक्षी आहे. कोणत्याही तापमानात बदक सहज टिकतो. कीड व कीटक हे बदकांचे प्रमुख खाद्य आहे. कोरीया, जपान, थायलंड या देशात राईस डग फार्मिंग करताना बदकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याच धर्तीवर आत्माच्या मार्गदर्शनात सेंद्रीय शेती करीत असलेल्या नैनपूर येथील शेतकºयांकडून धान शेतीतील तण व कीड नियंत्रणासाठी बदकांचा वापर सुरू आहे. भाग्यश्री सेंद्रीय शेतकरी गटाने २० बदकाची शेती केली असून त्याचे व्यवस्थापन व पोषण करण्याची जबाबदारी गटाचे सचिव शंकर भाजीपाले यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत या बदका धान पिकाच्या शेतीत सोडल्या जातात. धानाच्या खोडामध्ये सिलिका असल्याने हे बदक धान पीक न खाता धान पिकातील तण, खोडकिडे, तुडतुडे खातात. पिकावरील व चिखलातील कीडे खातात. यामुळे जमीन भुसभुशीत होऊन जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होते.
विसोरा गावाजवळ जिल्ह्यातील एकमेव बदक पैदास केंद्र आहे. जनावराला होणाऱ्या फिनस रोगाचे निर्मूलन करण्यासाठी व शेतकºयांना बदकांची पिले पुरविण्याकरिता विसोरा गावाजवळ बदक पैदास केंद्राची स्थापना करण्यात आली. येथून शेतकरी बदक नेत आहेत.
सेंद्रिय धान शेतीत बदक वापरल्याने सेंद्रिय शेतीची चाचणी कीड व तण निर्मुलन होते. तसेच यामुळे बदकांपासून धानाच्या उत्पादनात वाढ होते. तसेच पर्यावरण संतुलन व रक्षणाच्या दृष्टीने धान शेतीत बदकांचा वापर करणे हितकारक आहे. नैनपूर येथील शेतकऱ्यांनी बदकांचा प्रयोग सुरू केला आहे.
- डॉ. प्रकाश पवार,
प्रकल्प संचालक,
आत्मा गडचिरोली
बदक हा बहुउद्देशीय पक्षी आहे. बदकाचा वापर खाण्यासाठी व अंडीसाठी होतो. बदकांचा वापर तण व किड निर्मुलनासाठी केल्यास शेतकºयांना जास्त फायदेशीर ठरु शकते. बदक पैदास प्रक्षेत्रात हॅचरीची सुविधा असल्याने शेतकºयांनी बदकांची मागणी केल्यास स्वस्त दरात बदक पिल्ले उपलब्ध करुन देता येईल.
- डॉ. पी.जी.सुकारे,
पशुधन विकास अधिकारी,
बदक पैदास प्रक्षेत्र वडसा.