पावसाअभावी पेरणीची कामे पडली आहेत ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 10:25 PM2019-06-14T22:25:26+5:302019-06-14T22:26:07+5:30
रोहिणीनंतर आता मृग नक्षत्र सुध्दा कोरडा जात आहे. त्यामुळे पेरणीची कामे थांबली आहेत. पेरणी लांबल्यास त्याचा उत्पादनावर परिणाम होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. तसेच प्रचंड उकाड्यामुळे सामान्य नागरिकही मेटाकुटीस आला असून कधी पाऊस येतो व वातावरणात थंडावा निर्माण होतो, याकडे लक्ष लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रोहिणीनंतर आता मृग नक्षत्र सुध्दा कोरडा जात आहे. त्यामुळे पेरणीची कामे थांबली आहेत. पेरणी लांबल्यास त्याचा उत्पादनावर परिणाम होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. तसेच प्रचंड उकाड्यामुळे सामान्य नागरिकही मेटाकुटीस आला असून कधी पाऊस येतो व वातावरणात थंडावा निर्माण होतो, याकडे लक्ष लागले आहे.
सर्वसाधारणपणे जून महिन्याच्या सुरूवातीलाच पाऊस हजेरी लावत असल्याने पेरणीच्या कामांना सुरूवात होते. हाच अंदाज बांधून शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या दुसºया आठवड्यापासून खरीपपूर्व मशागतीच्या कामांना सुरूवात केली. मशागतीची कामे पूर्ण झाली तरी पावसाचा थेंबही अजूनपर्यंत पडला नाही. उलट कडक ऊन पडत आहे. दिवसा व रात्री सुध्दा उकाडा जाणवत आहे. पावसाळ्याचे दिवस नसून कडक उन्हाळा असावा, असे वातावरण निर्माण झाले आहे.
पाऊस पडत नसल्याने पेरणीची कामे पूर्णपणे ठप्प पडली आहेत. जेवढी पेरणीची कामे लांबतील. तेवढे उत्पादनात घट होते. तसेच नंतरही पावसाने दगा दिल्यास पीक करपण्याची शक्यता राहते. त्यामुळे शेतकरी सुध्दा चिंताग्रस्त झाला आहे. मागील वर्षी १४ जूनपर्यंत अर्ध्याहून अधिक पेरणीची कामे आटोपली होती. यावर्षी मात्र पाऊस झाला नाही. पाऊस पडल्यानंतर जवळपास आठ दिवसानंतर पेरणीला सुरूवात होते. त्यामुळे पेरणीची कामे आणखी आठ ते दहा दिवसांनी सुरूवात होण्याची शक्यता आहे.
पाऊस पडला नसल्याने अजूनपर्यंत शेतकऱ्यांनी पाहिजे त्या प्रमाणात बियाणे व रासायनिक खते सुध्दा खरेदी केली नाहीत. त्यामुळे कृषी केंद्र चालक सुध्दा अडचणीत आले आहेत.
मागील वर्षी पडला होता १३१ मिमी पाऊस
मागील वर्षी १४ जूनपर्यंत जिल्ह्यात १३०.९ मिमी पाऊस पडला होता. यावर्षी मात्र केवळ ४.९ मिमी पाऊस पडला आहे. पाऊस पडला आहे. त्यातीलही काही तालुक्यांमध्ये तर पावसाचे दर्शनच झाले नाही. त्यामुळे पेरणीची कामे पूर्णपणे ठप्प पडले आहेत. पाऊस पडल्यानंतर गवत उगवते. गवत उगवल्यानंतरच शेतकरी पेरणीच्या कामांना सुरूवात करतो. पावसाचे आगमन होण्यास पुन्हा चार ते पाच दिवसांचा कालावधी लागेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे पेरण्या पुन्हा लांबण्याची शक्यता आहे.
दुपारी रस्ते होताहेत निर्मनुष्य
दर दिवशी तापमानाचा पारा ४५ अंशाच्या वरच आहे. सकाळपासून वाढलेले तापमान सायंकाळपर्यंत कायम राहते. रात्रीसुध्दा प्रचंड गर्मी होत असल्याने कुल्लर सुध्दा काम करीत नाही. उकाड्याने नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. मृग नक्षत्राला सुरूवात होऊन सुध्दा कडक ऊन पडत असल्याने दुपारच्या सुमारास रस्ते अजुनही निर्मनुष्य होत आहेत. उष्णतेमुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.