सरपंच व सचिवावर कारवाईस दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 09:23 PM2017-09-23T21:23:27+5:302017-09-23T21:23:44+5:30
तालुक्यातील मोहझरीचे सरपंच व सचिवांनी अनेक नियमबाह्य कामे करून आर्थिक गैरव्यवहार केला. मृत माणसाला जिवंत दाखवून त्यालाही रोखीने पैसे दिले असल्याची रोकडवहीत नोंद करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील मोहझरीचे सरपंच व सचिवांनी अनेक नियमबाह्य कामे करून आर्थिक गैरव्यवहार केला. मृत माणसाला जिवंत दाखवून त्यालाही रोखीने पैसे दिले असल्याची रोकडवहीत नोंद करण्यात आली. याबाबत चौकशी अहवालात आर्थिक अपहारास सरपंच व सचिवाला संयुक्तरित्या जबाबदार धरून त्यांच्याकडून अपहाराची रक्कम वसूल करण्यासोबतच कार्यवाहीस पात्र ठरविण्यात आले. सरपंच व सचिवाकडून अपहाराची रक्कम तत्काळ वसूल करून त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात यावी, असा चौकशी अहवालही जि. प. कडे तीन महिन्यांपूर्वी पाठविण्यात आला. परंतु दोघांनाही पाठीशी घालले जात आहे. अशा जि. प. च्या अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सोनू साखरे यांनी गुरूवारी आरमोरी येथे पत्रकार परिषदेतून केली.
मोहझरी ग्रामपंचायतीच्या विविध कामात मोठा गैरव्यवहार झाल्याबाबतची तक्रार आपण आरमोरी पं. स. च्या बीडीओंकडे ५ जून २०१७ ला केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पं. स. विस्तार अधिकाºयांनी मोहझरी ग्रा. पं. मध्ये प्रत्यक्ष भेट देऊन कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर चौकशी अहवाल तयार करण्यात आला. संवर्ग विकास अधिकारी व विस्तार अधिकारी (पंचायत) यांच्या संयुक्त सहीच्या चौकशी अहवालात सरपंच व सचिवाने नियबाह्य कामे करून अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला. ग्रा. पं. च्या कामात जो अपहार झाला, त्याला सरपंच व सचिव हे दोघेही संयुक्तरित्या जबाबदार असल्याचे नमूद करण्यात आले. सरपंच मोहुर्ले यांच्याकडून १ लाख १० हजार ५७५ व सचिव मुळे यांच्याकडून १ लाख १३ हजार ४७७ रूपये वसुलीस व कायदेशिर कार्यवाहीस पात्र असल्याचे नमूद करण्यात आले.
सदर अहवाल सीईओ व डेप्युटी सीईओ यांच्याकडे २३ जूनला पाठविला. परंतु अद्यापही कोणतीही कार्यवाही झाली नाही. या अहवालात सीताराम बोरूले या मृत व्यक्तीच्या नावाने रोखीने रक्कम दिल्याची रोकड वहीत नोंद करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. सदर प्रकार गंभीर असतानाही त्यांच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. आपल्याला मारण्याच्या धमक्याही येत आहेत. त्यामुळे सरपंच, सचिवावर कारवाई करावी, असे साखरे यांनी म्हटले.