बोगस बियाणे कंपन्यांचा जिल्ह्यात सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 11:33 PM2018-04-19T23:33:48+5:302018-04-19T23:33:48+5:30
शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत काही बोगस बियाणे कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे. अशा कंपन्यांपासून शेतकऱ्यांनी सावध राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत काही बोगस बियाणे कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे. अशा कंपन्यांपासून शेतकऱ्यांनी सावध राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे.
राऊंडअप बीटी, एचटीबीटी (जणनाशक बीटी), बीजी-३, विड गार्ड, सूर्या या कंपन्यांचे बियाणे बोगस आहेत. या बियाण्यांच्या कंपन्यांना शासनाची कोणतीही परवानगी नाही. सदर बियाणांमुळे जमिनीचा पोत खराब होतो. मानवी जीवनास कॅन्सरसारखे दुर्धर रोग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कंपन्यांनी कोणतेही आश्वासन दिले तरी शेतकऱ्यांनी या आश्वासनांना बळी पडू नये, अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणांची खरेदी करावी, बियाणांची खरेदी करताना पक्की पावती घ्यावी, बियाणांचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व पॉकिटातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावी, भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणांचे पॉकिट सिलबंद व मोहोरबंद असल्याची खात्री करावी, पॉकिटावरील बियाणे वापरण्याची अंतिम मुदत व किंमत तपासून घ्यावी, बोगस बियाणांविषयी काही तक्रारी असल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा.
मार्गदर्शनासाठी १८००२३३४००० या नि:शुल्क दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, कृषी केंद्रातील बियाणे, खते यांची वेळोवेळी तपासणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पथक तयार केले आहेत. या पथकाकडेही तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे व कृषी विकास अधिकारी संजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
विक्रेत्याकडून पक्के बिलच स्वीकारा
खासगी बियाणे कंपन्या दुकानदाराला मोठ्या प्रमाणात मार्जिंन देतात. त्यामुळे बऱ्याचवेळा विक्रेते छापील किंमतीपेक्षा कमी किंमतीत बियाणे उपलब्ध करून देतात. मात्र बिल ओरिजनल न देता डुप्लिकेट बिल देतात. या डुप्लिकेट बिलाच्या माध्यमातून ते शेतकऱ्याकडून अधिक पैसे घेतात व ओरिजनल बिलावर मात्र कमी किंमत लिहितात. यामध्ये शेतकरी व शासनाची लूट होते. त्याचबरोबर बियाणे उगवले नाही. यासारखी समस्या निर्माण झाल्यास पक्के बिलच आवश्यक असल्याने शेतकऱ्यानी दुकानदाराला पक्के बिलच मागावे, असे आवाहन करण्यात आले आहे.