बांधकाम थांबल्याने रेतीचे भाव घसरले
By admin | Published: May 13, 2016 01:29 AM2016-05-13T01:29:50+5:302016-05-13T01:29:50+5:30
दरवर्षी उन्हाळ्यात रेतीचे भाव १४०० ते १५०० रूपयांवर जात होते. यावर्षी मात्र गडचिरोली शहरात ८०० ते ९०० रूपये ट्रॉली या दराने रेतीची विक्री करण्यात येत आहे.
गडचिरोलीत एनओसी देण्यास नकार
गडचिरोली : दरवर्षी उन्हाळ्यात रेतीचे भाव १४०० ते १५०० रूपयांवर जात होते. यावर्षी मात्र गडचिरोली शहरात ८०० ते ९०० रूपये ट्रॉली या दराने रेतीची विक्री करण्यात येत आहे. गेल्या चार ते पाच वर्षात रेतीचे हे दर सर्वात कमी असल्याचे बांधकाम व्यवसायातील नागरिकांचे म्हणणे आहे.
गडचिरोली शहरात २३ वॉर्ड असून शहराचा विस्तार चामोर्शी, धानोरा, चंद्रपूर व आरमोरी मार्गाकडेही सातत्याने वाढत आहे. नवीन घरांचे बांधकामही वेगाने सुरू आहे. मात्र गेल्या वर्षभरात गडचिरोली नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी अनेक नव्या बांधकामांना एनओसी दिलेली नाही. त्यामुळे बांधकाम ठप्प पडून आहे. पालिकेच्या परवानगीशिवाय अनेकांना बांधकाम करता आले नाही. त्यामुळे बांधकाम ठप्प झाल्याने रेतीची मागणी आपोआपच घसरली. याचा परिणाम रेती कंत्राटदारांच्या कामावरही झाला आहे.
रेतीची मागणी नसल्याने नदी घाटावरील मजुरांना कामही कमी दिवसांचे उपलब्ध होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)