पूल बांधकामाचा दर्जा सुमार
By Admin | Published: May 24, 2017 12:34 AM2017-05-24T00:34:56+5:302017-05-24T00:34:56+5:30
आरमोरी तालुक्यातील शंकरनगर-सालमारा मार्गावरील मोठ्या नाल्यावर सिमेंट काँक्रिटचे पूल बांधकाम झाले आहे. या पूल बांधकामात सिमेंटच्या पायल्या लावण्यात आल्या.
शंकरनगर-सालमारा मार्ग : पावसाळ्यात नाल्याचे पाणी शंकरनगरात शिरणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील शंकरनगर-सालमारा मार्गावरील मोठ्या नाल्यावर सिमेंट काँक्रिटचे पूल बांधकाम झाले आहे. या पूल बांधकामात सिमेंटच्या पायल्या लावण्यात आल्या. मात्र बांधकामाचा दर्जा सुमार असल्याने पावसाळ्यात या नाल्याचे पाणी पायलीतून न जाता शंकरनगर गावात शिरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शंकरनगरलगत असलेल्या सालमारा मार्गावरील मोठ्या नाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग आरमोरी या यंत्रणेमार्फत लाखो रूपये खर्च करून सिमेंट पायल्यांच्या सहाय्याने पूल बांधकाम करण्यात आले. नाल्याची खोली व पाण्याचा प्रवाह किती असते, याचा कुठलाही अंदाज न घेता हे काम आटोपून घेण्यात आले. पूल बांधकामापूर्वी येथे कुठल्याही प्रकारचे सर्वेक्षण करण्यात आले नाही. पूल बांधकामादरम्यान साईडवॉलसाठी निकृष्ट दर्जाची गिट्टी वापरण्यात आली. तसेच माती मिश्रीत रेतीचा वापर करून सिमेंट कमी प्रमाणात वापरण्यात आला. सिमेंट काँक्रिटचे बेड तयार न करता, माती टाकून त्यावर सिमेंट पायल्या बसविण्यात आल्या. पायल्यांवर माती टाकून सिमेंट काँक्रिटचे काम थातूर-मातूर करण्यात आले.
सदर काम सुरू असताना एकदाही संबंधित अभियंत्यांनी प्रत्यक्ष भेट दिली नाही. त्यामुळे कंत्राटदाराने आपल्या मनमर्जीने कमी पैशात सदर पुलाचे बांधकाम पूर्ण करून घेतले. या ठिकाणी तयार करण्यात आलेला पूल आहे की रपटा हे स्पष्ट सांगण्यास कुणीही तयार नाही.
तात्पुरती व्यवस्था झाली असली तरी नाल्याचे संपूर्ण पाणी या पायल्यांतून जाण्याची शक्यता कमी आहे. वाढीव पाणी गावात जाऊ शकते. शिक्षण घेणाऱ्या मुला- मुलींना पावसाळ्यात या पुलामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे काम करणाऱ्या अभियंता व कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शंकरनगर येथील नागरिकांनी केली आहे.
शंकरपूर- सालमारा नाल्यावरील पुलाच्या बांधकामाने शंकरनगर येथील शेतजमिन पाण्याखाली येणार याची १०० टक्के शाश्वती आहे. सदर बांधकाम संबंधित गावाच्या कोणत्याच पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता तसेच खरी अडचण लक्षात घेऊन संबंधित कंत्राटदार यांच्या उदरनिर्वाहासाठी शासनाने करून घेतले असून हे काम निकृष्ट दर्जाचे आहे.
- सुजित मिस्त्री, सरपंच,
शंकरनगर.