नावेने धोकादायक प्रवास सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 12:45 AM2018-11-07T00:45:50+5:302018-11-07T00:47:15+5:30
तेलंगणा राज्याच्या चिनूर व मंचेरियालकडे जाण्यासाठी सिरोंचा तालुक्यातील अनेक नागरिक शॉर्टकट व सोयीचा मार्ग म्हणून प्राणहिता नदीपात्रातून नावेने प्रवास करतात. पावसाळ्यातही असा धोकादायक प्रवास होत असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तेलंगणा राज्याच्या चिनूर व मंचेरियालकडे जाण्यासाठी सिरोंचा तालुक्यातील अनेक नागरिक शॉर्टकट व सोयीचा मार्ग म्हणून प्राणहिता नदीपात्रातून नावेने प्रवास करतात. पावसाळ्यातही असा धोकादायक प्रवास होत असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्टÑ व तेलंगणा या दोन राज्यांना जोडणारा मोठा पूल गोदावरी नदीवर बांधण्यात आला व या पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. महाराष्टÑ व तेलंगणा या दोन्ही राज्याच्या बसगाड्या गोदावरी नदीच्या पुलावरून आवागमन करीत आहेत. उन्हाळा व हिवाळ्यात सिरोंचा-कालेश्वर-पलगुला नजीक गोदावरी नदीपात्रात कच्चा रस्ता होता. त्यावेळी तेलंगणातील चिन्नूर, मंचेरियलकडे लोक बसने जात असायचे. मात्र आता पावसाळ्यात नदी दुथळी भरून वाहत असल्याने येथून रस्ता राहत नाही. त्यामुळे पावसाळ्यात बसने जायचे असेल तर महादेवपूरवरून बसने मंचेरियलकडे जाता येते. मात्र हा ६० किमीचा फेरा होतो. या मार्गे प्रवास केल्यास तिकीटापोटी प्रवाशांवर आर्थिक भूर्दंडही पडत असते. त्यामुळे बरेच नागरिक बसच्या मार्गाने न जाता सिरोंचाजवळील प्राणहिता नदीपात्रातून नावेने प्रवास करतात. तेलंगणाच्या सिमेवरील अर्जुनगट्टा गावातून तेलंगणाच्या बसने पुढे अनेक लोक जातात. सिरोंचा-चेन्नूर हे ३० किमीचे अंतर आहे. तसेच चेन्नूर ते मंचेरियल हे ३५ किमीचे अंतर आहे.
सिरोंचा - चेन्नूरदरम्यान रापनपेल्ली, बक्कलचेलका, देवलाडा, रामपूर, पारपेल्ली, येरोपपेट्टा, चिंतलपल्ली आदी गावे पडतात. या सर्व गावातील रहिवासी नागरिक नावेचा प्रवास करून सिरोंचा मुख्यालयी पोहोचतात. प्राणहिता नदीवर धर्मपुरी गावाजवळ निर्माणाधिन पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर प्रवाशांना नावेचा प्रवास पूर्णत: बंद होणार आहे.
सध्या सिरोंचावरून मंचेरियलला बसने जायचे असल्यास सिरोंचा-कालेश्वर-महादेवपूर, काठाराम, मंचनी, गोदावरी, खनी येथून मंचेरियलला पोहोचता येते. मात्र या मार्गे ६० किलोमीटर अंतराचा अधिकचा फेरा मारावा लागतो. सदर मार्गे प्रवास केल्यास एकूण १२५ किमीचे अंतर गाठावे लागते. सिरोंचा नजीकच्या प्राणहिता नदीवरून अर्जूनगुट्टावरून बसने ६५ किमीचे अंतर गाठावे लागते. सदर अधिकचे अंतर कापणे आर्थिकदृष्ट्या या भागातील नागरिकांना परवडत नसल्याने सिरोंचा तालुक्यातील व सिरोंचा पलीकडचे तेलंगणा राज्यातील अनेक लोक नदीपात्रातून नावेने प्रवास करतात.