आवक घटल्याने भाजीपाला कडाडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 05:00 AM2020-07-22T05:00:00+5:302020-07-22T05:00:36+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी नोव्हेंबर ते मे या कालावधीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. या कालावधीत कीड कमी प्रमाणात लागते. त्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी येतो. तसेच धान निघाल्यानंतर त्याच ठिकाणी भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. पावसाळ्यात मात्र पावसामुळे भाजीपाल्याची झाडे जगू शकत नाही. तसेच जास्त प्रमाणात कीड लागत असल्याने वेळोवेळी फवारणी करावी लागते.
दिगांबर जवादे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे भाजीपाला उत्पादन जवळजवळ बंद झाले आहे. परिणामी नागपूरच्या ठोक बाजारपेठेतून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या भाजीपाल्यावर गडचिरोलीकरांना विसंबून राहावे लागत आहे. नागपूरच्या बाजारपेठेत भाव वाढल्याने त्याचा थेट परिणाम गडचिरोली जिल्ह्यातील भाज्यांच्या किमतीवर झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी नोव्हेंबर ते मे या कालावधीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. या कालावधीत कीड कमी प्रमाणात लागते. त्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी येतो. तसेच धान निघाल्यानंतर त्याच ठिकाणी भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. पावसाळ्यात मात्र पावसामुळे भाजीपाल्याची झाडे जगू शकत नाही. तसेच जास्त प्रमाणात कीड लागत असल्याने वेळोवेळी फवारणी करावी लागते. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी पावसाळ्यात भाजीपाल्याचे उत्पादन घेत नाही. सद्यस्थितीत नागपूर येथून येणाऱ्या भाजीपाल्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. नागपूर बाजारपेठेतून दर दिवशी गडचिरोली येथील गुजरीत मालवाहू वाहनांनी भाजीपाला आणला जातो. नागपुरात भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. त्याचा थेट परिणाम गडचिरोली जिल्ह्यातील भाजीपाला दरावर झाला. लॉकडाऊन आधीच्या तुलनेत ५० टक्के भाव वाढले आहेत.
टोमॅटोचे दर झाले दुप्पट
टोमॅटो हा भाजीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. उन्हाळभर टोमॅटो २० ते ४० रूपये दराने उपलब्ध होत होते. मात्र मागील १५ दिवसांपासून टोमॅटोच्या दरात अचानक वाढ झाली आहे. सुमारे ७० ते ८० रूपये किलो दराने टोमॅटो खरेदी करावे लागत आहेत.
भेंडी थोडी सावरली
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भेंडीचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी भेंडीसाठी हवामान चांगले असल्याने मोठ्या प्रमाणात भेंडीचे उत्पादन झाले. त्यामुळे लॉकडाऊनपूर्वी आणि नंतरही काही दिवस १० ते १५ रूपये किलो दराने शेतकरी शहरात फिरून भेंडीची विक्री करीत होते. आता मात्र शेतकऱ्यांची भेंडी निघणे बंद झाल्याने भेंडीचे भाव वाढले असून ३० रूपयाला किलो दराने विकली जात आहे.
लिंबाचे भाव घसरले
पावसाळ्यात लिंबू मोठ्या प्रमाणात लागतात. तसेच पावसाळ्यातील लिंबूचा आकारसुद्धा मोठा राहते. त्यामुळे इतर भाजीपाला महाग झाला असताना लिंबू मात्र स्वस्त झाले आहेत. पूर्वी १० रूपयाला दोन किंवा तीनच लिंबू दिले जात होते. आता मात्र दहा रूपयाला पाच ते सहा लिंबू दिले जात आहेत. लोंच टाकण्यासाठी लिंबू खरेदी केले जातात.