खडतर रस्त्यामुळे मार्गातच झाली प्रसुती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:04 AM2018-09-13T00:04:43+5:302018-09-13T00:06:00+5:30
रस्त्यांची दुरवस्था व वाहतुकींच्या साधनांचा अभाव या कारणाने गर्भवती महिलांची रस्त्यातच प्रसूती होण्याचे प्रकार अहेरी उपविभागासह कुरखेडा व कोरची तालुक्यात आता उघडकीस येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : रस्त्यांची दुरवस्था व वाहतुकींच्या साधनांचा अभाव या कारणाने गर्भवती महिलांची रस्त्यातच प्रसूती होण्याचे प्रकार अहेरी उपविभागासह कुरखेडा व कोरची तालुक्यात आता उघडकीस येत आहेत. एटापल्ली तालुक्याच्या बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत मंगुठा गावातील एका गर्भवती महिलेला एटापल्लीच्या रुग्णालयात आणताना प्रवासादरम्यान रुग्णवाहिकेतच प्रसुती झाल्याची घटना १० सप्टेंबर रोजी सोमवारला घडली. विशेष म्हणजे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहने जात नसल्याने सदर महिलेला बैलबंडीवर आणण्यात आले.
मंगुठा येथील गर्भवती महिला शांतीबाई बलराम मडावी हिची प्रसूती रुग्णवाहिकेत झाली असून तीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. नवजात बाळांचे वजन कमी असल्याने त्यांना मातेसह अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. एकीकडे शासन डिजिटल इंडियाचा नारा देत आहे. मात्र अहेरी उपविभागासह गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते, वाहतुकीची साधने व आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष होत आहे. आजही एटापल्ली तालुक्यतील अनेक गावांना पोहोचण्यासाठी रस्ते नसल्याने नवजात मुलासह मातांना रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच आपला जीव गमवावा लागत आहे.
शांतीबाई मडावी या गर्भवती महिलेला प्रसुतीच्या कळा येऊ लागल्याने कुटुंबीयांनी तिला बुर्गीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे कुठलीही वाहतुकीची साधने नसल्याने सदर महिलेला बैलबंडीवर टाकून कच्च्या रस्त्याने मुख्य मार्गापर्यंत आणण्यात आले. चार किमीची पायपीट केल्यावर मुख्य मार्गावरील पैमा या गावावरून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयाकडे आणण्यात येत होते.
दरम्यान एटापल्लीपासून पाच किमी अंतरावर असलेल्या तुमरगुंडा गावाजवळ सदर महिलेची प्रसूती झाली. महिलेने दोन जुळ्या नवजात बालकांना जन्म दिला. त्यानंतर रुग्णवाहिकेने या महिलेला एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येथे नवजात बालकांचे वजन करण्यात आले. वजन कमी असल्याने त्यांना अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी मंगुठा गावापासूनच आशावर्कर सदर गर्भवती महिलेसोबत सेवेवर होती. सदर घटनेमुळे अहेरी उपविभागात आरोग्याचा प्रश्न गंभीर झाल्याचे दिसून येत आहे.
महिनाभरापूर्वी नवजात बाळ दगावले
महिनाभरापूर्वी तालुक्यातील पुस्के येथील एका गर्भवती महिलेला रस्त्याअभावी गावातील चार युवकांनी खाटेवर प्रसूतीसाठी रुग्णालयात आणले. दरम्यान महिलेच्या पोटातच नवजात बाळ दगावल्याची घटना घडली होती. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एटापल्ली तालुक्यात अशा प्रकारच्या घटना वाढू लागल्या आहेत. एवढेसारे होऊनही शासन व प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे. तालुक्यातील सर्वच मार्गांची दुरवस्था असताना एकाही मार्गाच्या दुरूस्तीचे काम मंजूर करण्यात आले नाही. हे येथे उल्लेखनीय. स्थानिकस्तरावर आरोग्यसेवा पुरविण्यासाठी रस्ते व पुलांचे बांधकाम करणे अत्यावश्यक आहे, तशी मागणी होत आहे.