गटार, घरकुलांमुळे अर्थसंकल्प दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:13 AM2018-02-23T00:13:30+5:302018-02-23T00:13:47+5:30

गडचिरोली शहरातील दोन अत्यंत महत्त्वपूर्ण व मोठ्या योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूमिगत गटार योजनेचे २५ कोटी रूपये व प्रधानमंत्री आवास योजनेचे सुमारे ६७ कोटी रूपये प्राप्त झाल्याने मागील दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत पहिल्यांदाच .....

Due to drainage and brood, the budget doubles | गटार, घरकुलांमुळे अर्थसंकल्प दुप्पट

गटार, घरकुलांमुळे अर्थसंकल्प दुप्पट

Next
ठळक मुद्देगडचिरोली नगर परिषद : १६० कोटी ३३ लाख रूपयांचे बिग बजेट सादर

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : गडचिरोली शहरातील दोन अत्यंत महत्त्वपूर्ण व मोठ्या योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूमिगत गटार योजनेचे २५ कोटी रूपये व प्रधानमंत्री आवास योजनेचे सुमारे ६७ कोटी रूपये प्राप्त झाल्याने मागील दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत पहिल्यांदाच गडचिरोली शहराचे अंदाजपत्रक दुपटीने वाढले आहे. विशेष म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच अंदाजपत्रक १०० कोटींच्यावर गेले आहे. नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी पार पडलेल्या सभेत सदर अंदाजपत्रकाला मंजुरी प्रदान करण्यात आली.
अर्थसंकल्पात महसुली जमामध्ये २०१८-१९ ची प्रारंभीची शिल्लक ५ लाख १६ लाख २९ हजार ४०३ रूपये दाखविण्यात आली आहे. नगर परिषदेला स्वत:च्या उत्पन्नातून सुमारे २९ कोटी ९२ लाख ३० हजार रूपये उत्पन्न मिळणार आहे. प्रारंभीची शिल्लक व २०१८-१९ मध्ये प्राप्त होणारे उत्पन्न असे एकूण ३५ कोटी ८ लाख ५९ हजार ४०३ रूपये एकूण महसुली जमा राहणार आहे. २०१८-१९ मध्ये एकूण ३५ कोटी ५ लाख १४ हजार रूपये खर्च होणार आहेत. एकूण शिल्लक ३ लाख ४५ हजार ४०३ रूपये राहणार आहे.
सुरुवातीची भांडवली जमा १७ कोटी ४३ लाख २८ हजार ६७० रूपये आहे. शासनाकडून विविध अनुदानांच्या माध्यमातून सुमारे १०७ कोटी ९० लाख रूपये प्राप्त होणार आहेत. एकूण भांडवली जमा १२५ कोटी ३३ लाख २८ हजार ६७० रूपये राहणार आहे. एकूण भांडवली खर्च १२५ कोटी २८ लाख ५० हजार रूपयांचा आहे. भांडवली जमेतून खर्च वगळता ४ लाख ७८ हजार ६७० रूपये शिल्लक राहणार आहेत.
गडचिरोली शहराला दरवर्षी साधारणपणे १० ते २० कोटी रूपयांपर्यंत शासनाकडून विविध योजनांसाठी अनुदान प्राप्त होत होते. २०१४-१५ या वर्षात शासनाकडून ९ कोटी ३८ लाख, २०१५-१६ मध्ये १५ कोटी २१ लाख, २०१६-१७ मध्ये ४ कोटी ८८ लाख व २०१७-१८ मध्ये जवळपास ६३ कोटी ९८ लाख रूपयांचे अनुदान प्राप्त होत होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गडचिरोली शहरात जवळपास १ हजार २०० घरांना मंजुरी मिळाली आहे. यासाठी शासनाकडून सुमारे ६७ लाख रूपये उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर गडचिरोली शहरात भूमिगत गटार योजनेसाठी २५ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या दोनच योजनांच्या निधीची बेरीज १०० कोटींचा आकडा पार करीत आहे. त्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच गडचिरोली शहराचा अर्थसंकल्प सुमारे १६० कोटी ३३ लाख रूपयांचा मांडण्यात आला आहे. सदर अर्थसंकल्पीय सभेला पालिकेतील सर्व सभापती, नगरसेवक, मुख्याधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रमुख बाबींवरील खर्च
२०१८-१९ च्या अर्थसंकल्पात प्रामुख्याने फर्निचर खरेदीवर ४ लाख ५० हजार, संगणक खरेदीसाठी १५ लाख, पंचवार्षिक कर आकारणी ठेका देण्यासाठी ५० लाख रूपये, विद्युत दिव्यांची देखभाल व दुरूस्तीवर ३५ लाख रूपये, बोअरवेल दुरूस्तीसाठी ३० लाख रूपये, नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी १० लाख रूपये, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी एक कोटी रूपये, फिल्टर दुरूस्तीसाठी ३.२५ लाख रूपये, जीपीएस यंत्रणेकरिता पाच लाख रूपये, सफाई कामगारांना घरे बांधून देण्यासाठी १० लाख रूपये, दुर्बल, महिला व बालकल्याणसाठी २ लाख ५८ हजार रूपये, ट्रिगार्ड खरेदीसाठी १० लाख रूपये, लहान मुलांचे खेळणी व गार्डन चेअरसाठी १० लाख रूपये, भूसंपादनसाठी २० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

उत्पन्न वाढीच्या दृष्टीने कोणतीही तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली नाही. शासनाकडून प्राप्त झालेले २० कोटी रूपये सभागृहाची परवानगी न घेताच अ‍ॅक्सिस बँकेत फिक्स डिपोझिट केले आहेत. सदर रक्कम राष्टÑीयकृत बँकेत जमा करावी. एप्रिल ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत ट्रीगार्ड खरेदीवर ४ लाख ५९ हजार रूपये खर्च झाल्याचे दाखविले आहे. मात्र छत्रपती शाहू नगर प्रभागात एकही ट्रीगार्ड उपलब्ध झाले नाही.
- सतीश विधाते, नगरसेवक, न.प. गडचिरोली

नगर परिषद आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी महसुली उत्पन्नात वाढ होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. शहरातील महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन त्यानुसार खर्च दाखविण्यात आला आहे. अनावश्यक खर्चाला फाटा देण्यात आला आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने अर्थसंकल्प मांडला आहे.
- योगीता पिपरे, नगराध्यक्ष, न.प. गडचिरोली

Web Title: Due to drainage and brood, the budget doubles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.