दुष्काळी स्थितीमुळे कर्जवसुलीवर संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2016 01:49 AM2016-01-06T01:49:46+5:302016-01-06T01:49:46+5:30
गडचिरोली जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात पाऊस अतिशय अनियमित व कमी प्रमाणात झाला.
१३९८ गावे दुष्काळग्रस्त : वसुलीच्या टक्केवारीतही घसरण
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात पाऊस अतिशय अनियमित व कमी प्रमाणात झाला. त्यामुळे खरीप हंगामात उत्पन्नाचा उताराही घसरला. शेतकरी आर्थिक अडचणीत आलेत. त्यातच १३९८ गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला दिला आहे. या सर्व बाबीचा थेट परिणाम बँकांनी खरीप हंगामात केलेल्या कर्ज वाटपाच्या वसुलीवर झाला असून यावर्षी कर्ज वसुलीचे मोठे संकट बँकांसमोरही उभे ठाकले आहे.
१५ डिसेंबर २०१५ पर्यंत जिल्ह्यात ११२ कोटी २५ लाख रूपयांचे कर्ज १० बँकांनी वितरित केलेले आहे. त्यात सर्वाधिक ५२ कोटी ६४ लाखांचे कर्ज गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वितरित केले आहे. सदर कर्ज हे खरीप व रबी या दोन्ही हंगामासाठी वर्षभर वितरित केले जाते. धान, सोयाबिन, कापूस या पिकांना पीक कर्ज दिले जात असते. यावर्षी खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस झाला असला तरी खरीप हंगामातील शेतीसाठी हा पाऊस काहीही उपयोगाचा झाला नाही. त्यामुळे पेरणी उशीरा झाल्याने धान पिकाच्या उत्पादनावरही प्रचंड परिणाम झाला आहे. गतवर्षी एका एकरात १५ ते २० क्विंटल धानाचे उत्पादन झाले होते. तेथेच यंदा केवळ आठ क्विंटल धानाचे उत्पादन झाले. अंतिम पैसेवारी जाहीर करून जिल्हा प्रशासनाने १३९८ गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याचे शासनाला कळविले आहे.
३१ मार्च २०१६ पर्यंत खरीप पिकाची कर्ज वसुली बँका करीत असतात. अनेक बँकांकडून शेतकऱ्यांना व्याजावर सवलतही दिली जाते. यंदा मात्र दुष्काळी परिस्थिती त्यातच शासनाच्या एकाधिकार व हमीभाव खरेदी केंद्रांची कमतरता याचा थेट परिणाम बँकांच्या कर्ज वसुलीवर होत आहे. बरेच वेळा हमी भाव खरेदी केंद्रावर तसेच एकाधिकार धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा माल आल्यावर चुकारे देताना त्यातून बँकांच्या कर्जाची कपात सेवा सहकारी संस्थामार्फत करून घेण्यात येत होती. यंदा ज्या गावात गोदामाची व्यवस्था आहे, अशाच गावात शासनाने खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक मोठ्या गावांमध्ये खरेदी केंद्र सुरू झाले नाही. शेतकऱ्यांनी आपला माल व्यापाऱ्यांना विकला. त्यामुळे बँकांना शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करणे अडचणीचे ठरत आहे. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने डिसेंबरपर्यंत केवळ ५० लाख रूपयांचीच चालू कर्जाची वसुली केलेली आहे. यापेक्षाही बिकट परिस्थिती इतर बँकांची आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चालू व थकीत कर्जाची वसुली केली असून ५४ कोटी रूपयांचे कर्ज त्यांनी खरीप हंगामात वाटप केले होते. त्यापैकी केवळ ५० लाख रूपयांचीच वसुली होऊ शकली. बँकेशी २५९ सेवा सहकारी संस्था जुळलेल्या आहे. मात्र या सर्व सेवा सहकारी संस्थांकडे खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. केवळ २० ते २४ ठिकाणच्या केंद्रांवर धान खरेदी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे बँकांच्या वसुलीवरही याचा परिणाम होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्याची गरज आहे. यंदा धान उत्पादक शेतकऱ्यांची प्रचंड दानादान उडाली असून ९० टक्के शेतकऱ्यांनी आपला माल व्यापाऱ्यांना विकला आहे. शासनाचे खरेदी केंद्र सुरू झाले नाही. मातीमोल भावात धान विकावा लागला. कर्ज फेडण्याची क्षमता यावर्षी शेतकऱ्यांमध्ये राहिलेली नाही. शासनाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची गरज आहे. परंतु याबाबत लोकप्रतिनिधी उदासीन आहेत.
- रामचंद्र सिडाम, शेतकरी, अहेरी