मद्यधुंद चालकामुळे चिमूकलीचे प्राण आले होते धोक्यात
By admin | Published: May 3, 2017 01:30 AM2017-05-03T01:30:04+5:302017-05-03T01:30:04+5:30
तालुका मुख्यालयापासून सात किमी अंतरावर असलेल्या महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिकेचा चालक
महागाव पीएचसीतील घटना : चालकावर कारवाईची मागणी
अहेरी : तालुका मुख्यालयापासून सात किमी अंतरावर असलेल्या महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिकेचा चालक ३० एप्रिलच्या रात्री मद्यधूंद अवस्थेत असल्याने प्रकृती बिघडलेल्या सात महिन्याच्या मुलीला अहेरी रूग्णालयात भरती करण्यास अडचण निर्माण झाली. त्यामुळे सदर बालिकेचा जीव धोक्यात आला होता. मद्यधूंद अवस्थेत असलेल्या चालकावर कारवाई करावी, अशी मागणी मुलीच्या आई वडिलांनी केली आहे.
३० एप्रिल रोजी रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी महागाव येथील अवनी मनोज रामटेके या सात महिन्याच्या चिमुलीची अचानक प्रकृती बिघडली. तिला तत्काळ महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. यावेळी डॉ. अल्का उईके व अधिपरिचारिका डोंगरे उपस्थित होत्या. अवनीची प्रकृती गंभीर असल्याने तिला अहेरी उपजिल्हा रूग्णालयात भरती करण्याचा सल्ला दिला. रूग्णवाहिकेचा चालक संतोष गेडाम हा मात्र मद्यधूंद अवस्थेत असल्याने रूग्णवाहिका चालविणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान चिमुकलीची प्रकृती आणखी गंभीर झाल्याने गावातील तरूण चेतन दुर्गे याने स्वत: रूग्णवाहिका चालवत इतर युवकांच्या मदतीने चिमुकलीला अहेरी उपजिल्हा रूग्णालयात भरती केले. रूग्णवाहिका चालकाच्या निष्काळजीपणामुळे सात महिन्याच्या चिमुकलीचा जीव धोक्यात आला होता. संतोष गेडाम हा नेहमी दारू पिऊन राहत असतो, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याची शहानिशा करण्यासाठी लोकमत प्रतिनिधीने स्वत: महागाव येथे जाऊन भेट दिली असता, चालक मद्यधूंद अवस्थेत आढळून आला. रूग्णवाहिका कुठे आहे, असा त्याला विचारले असता, रूग्णवाहिका उभी आहे. असे उत्तर दिले. मात्र त्यावेळी रूग्णवाहिका चिमुकलीला घेऊन अहेरी येथे गेली होती. गेडाम याच्यावर कारवाई वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याच्यावर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. यावरून त्याला वरिष्ठांचे अभय असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. (प्रतिनिधी)
रूग्णवाहिकेला अपघाताची शक्यता
रूग्णवाहिकेचा चालक संतोष गेडाम हा नेहमी मद्यधूंद अवस्थेत राहतो. एखाद्या गंभीर स्थितीतील रूग्णाला दाखल करायचे असेल तर त्यावेळी मद्यधूंद अवस्थेतच तो वाहन चालवितो. त्यामुळे रूग्णवाहिकेला अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या नागरिकांना संतोषचे दारूचे व्यसन माहित आहे. ते नागरिक आपल्या नातेवाईकाला रूग्णवाहिकेतून नेण्याऐवजी खासगी वाहनाने नेणे पसंत करतात.