गॅसमुळे वृक्षतोडीवर आळा बसणार
By admin | Published: May 24, 2016 01:31 AM2016-05-24T01:31:43+5:302016-05-24T01:31:43+5:30
सरपणासाठी मोठ्या झाडांची होणारी कत्तल थांबविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने वन विभागामार्फत सबसीडीवर गॅस वाटपाची योजना अंमलात आणली.
क्रिष्णा गजबे यांचा आशावाद : शिवराजपुरात गॅस वितरण
देसाईगंज : सरपणासाठी मोठ्या झाडांची होणारी कत्तल थांबविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने वन विभागामार्फत सबसीडीवर गॅस वाटपाची योजना अंमलात आणली. गॅस सिलिंडरच्या वापरामुळे येणाऱ्या काळात निश्चितच वृक्षतोडीस आळा बसणार, असा आशावाद आमदार क्रिष्णा गजबे यांनी व्यक्त केला.
वडसा वन परिक्षेत्र कार्यालय अंतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समिती शिवराजपूरच्या वतीने शिवराजपूर येथे सोमवारी लाभार्थ्यांना गॅस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पं.स. सभापती प्रिती शंभरकर यांच्या हस्ते झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून देसाईगंज न.प.चे उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, सरपंच मारोती बगमारे, वन परिक्षेत्राधिकारी नरेंद्र चांदेवार, गॅस एजन्सीचे मालक मनिष समर्थ, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद झिलपे, भाजपा तालुकाध्यक्ष राजेश जेठाणी, उपसरपंच रमेश वाढई, सुरेश खरकाटे, हेमंत दरवे, राजेंद्र दुपारे, वासुदेव झिलपे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रमोद झिलपे यांनी केले तर आभार वनरक्षक मडावी यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
कल्याणकुमार यांची संकल्पना
गडचिरोलीचे मुख्यवनसंरक्षक पी. कल्याणकुमार यांनी शासनाकडे गॅस सिलिंडर वाटपाच्या योजनेबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. ते यापूर्वी देसाईगंज येथे उपवनसंरक्षक असताना जंगलावरचा भार कमी करण्यासाठी या योजनेची संकल्पना त्यांनी मांडली होती.