सद्भावनेमुळेच वाढतेय जिल्हा बँकेची प्रतिमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 06:00 AM2019-11-09T06:00:00+5:302019-11-09T06:00:30+5:30
दीप टंडन म्हणाल्या, कमीत कमी चुका करत जास्तीत जास्त जलद सेवा देण्याचे कसब जिल्हा बँकेने साध्य केले आहे. त्यामुळेच ही बँक रिझर्व्ह बँकेकडून आयएफएससी कोड पाटकावणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा बँक ठरली. बँकेची सेवा भविष्यात अधिक ग्राहकोपयोगी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सीईओ सतीश आयलवार यांनी प्रास्ताविकातून बँकेच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा आढावा सांगितला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आजपर्यंत जिल्ह्यातील साडेचार लाख लोकांना आपल्याशी जोडले. विविध ग्राहकोपयोगी सेवेसोबतच बँकेने खातेदारांबद्दल जपलेली सद्भावना यामुळेच या बँकेची चांगली प्रतिमा तयार झाली असून ही प्रतिमा दिवसेंदिवस आणखी उजळेल, असा विश्वास गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी व्यक्त केला.
बँकेच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित खातेदारांचा मेळावा व सत्कार कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमाला एचएसबीसी बँकेच्या माजी उपाध्यक्ष दीपा टंडन (कोलकाता), बँकेचे संचालक तथा माजी उपाध्यक्ष डॉ.बळवंत लाकडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार प्रामुख्याने उपस्थित होते.
दीप टंडन म्हणाल्या, कमीत कमी चुका करत जास्तीत जास्त जलद सेवा देण्याचे कसब जिल्हा बँकेने साध्य केले आहे. त्यामुळेच ही बँक रिझर्व्ह बँकेकडून आयएफएससी कोड पाटकावणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा बँक ठरली. बँकेची सेवा भविष्यात अधिक ग्राहकोपयोगी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सीईओ सतीश आयलवार यांनी प्रास्ताविकातून बँकेच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा आढावा सांगितला. काही ज्येष्ठ ग्राहकांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सेवानिवृत्त झालेल्या व बँकेचे पगारदार खातेधारक असलेल्या विविध क्षेत्रातील आठ लोकांचा सपत्निक शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यात भास्कर रामटेके, नरेशचंद्र कोडापे, श्यामराव अवखरे, कल्पना भोयर, सुधाकर तुमराम, प्रकाश गाठे, रामदास टिकले व कमलाकर बांगरे आदींचा समावेश होता.
- तर उलाढाल पोहोचणार ५ हजार कोटींवर
यावेळी मार्गदर्शन करताना बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार म्हणाले, जिल्हा बँकेने शेतकरी, महिला बचत गटांसह युवकांसाठी मोबाईल बँकिंग, सुवर्णतारण अशा विविध समाज घटकांसाठी सेवा देणे सुरू केले. ग्राहकांच्या विश्वासामुळेच बँकेची प्रगती होत आहे. पण आम्ही अजूनही परिपूर्ण झालो असे समजत नाही. आता ३ हजार कोटींच्या व्यवसायाचा पल्ला गाठत असलेली ही बँक याच गतीने वाटचाल करत राहिल्यास पुढील पाच वर्षात ५ हजार कोटींचा पल्ला गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.