धान्य वाटपात लिंक फेलचा फटका
By Admin | Published: April 17, 2017 01:33 AM2017-04-17T01:33:23+5:302017-04-17T01:33:23+5:30
स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजाराला रोख लावण्यासाठी तसेच लाभार्थ्यांना सुविधा देण्याच्या नावाखाली
पीओएस मशीनच्या वापरात अडचणी : लाभार्थ्यांसह दुकानदारांचीही डोकेदुखी वाढली
गडचिरोली : स्वस्त धान्य दुकानातील काळ्या बाजाराला रोख लावण्यासाठी तसेच लाभार्थ्यांना सुविधा देण्याच्या नावाखाली शासनाने स्वस्त धान्य वाटपाची प्रक्रिया बायोमेट्रीक पध्दतीने सुरू केली आहे. या अंतर्गत जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना पीओएस मशीनचे वाटप करण्यात आले. मात्र लिंक फेलमुळे पीओएस मशीन गतीने नोंदी घेत नसल्याने सदर पध्दत लाभार्थ्यांसह दुकानदारांसाठी डोकेदुखी ठरली आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात एकूण १ हजार १९१ परवानाप्राप्त मंजूर स्वस्त धान्य दुकाने आहेत. या दुकानातून गावातील लाभार्थ्यांना गहू, तांदूळ, केरोसीन आदींचे वितरण केले जाते. गडचिरोली तालुक्यात १०७, धानोरा १२६, चामोर्शी १९८, मुलचेरा ६५, देसाईगंज ६४, आरमोरी ९७, कुरखेडा ९८, कोरची ५६, अहेरी ११८, सिरोंचा १०४, एटापल्ली ११८ व भामरागड तालुक्यात ४७ स्वस्त धान्य दुकान आहे. बाराही तालुके मिळून अंत्योदय योजनेच्या पिवळ्या शिधापत्रिकाधारकांची एकूण संख्या ९१ हजार ७४२ आहे. तर बीपीएल धारक लाभार्थ्यांची संख्या एकूण ३९ हजार ३६१ आहे. जिल्हाभरात ३८ हजार १४७ केशरी शिधापत्रिकाधारक एपीएल लाभार्थी आहेत. तसेच प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांची एकूण संख्या ८१ हजार ४३७ आहे. धान्य वितरण प्रणालीतील दोष टाळण्यासाठी शासन व प्रशासनाने पीओएस मशीनद्वारे बायोमेट्रीक पध्दतीचा अवलंब सुरू केला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना पीओएस मशीनचे वाटप जिल्हा व तालुका पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. पीओएस मशीनद्वारे धान्याचे वाटप करताना सर्व प्रथम कार्डाचा नंबर पीओएस मशीनमध्ये नोंद केला जाते. त्यानंतर रेशन कार्डावरील प्रमुख व्यक्तीचा अंगठा त्यावर घेतला जातो. त्यानंतर पीओएस मशीनमधून संपूर्ण तपशीलाची पावती ग्राहकांना मिळते. त्यानंतर धान्याचे वाटप संबंधित लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानदार करतात. मात्र लिंक फेलचा फटका बसत असल्याने सदर पीओएस मशीन गतीने काम करीत नाही. दुकानदार व लाभार्थ्यांना बराच वेळ या कामासाठी द्यावा लागतो. पूर्वी साधी, सरळ पध्दत असल्याने कमी वेळेत लाभार्थ्यांना धान्याचे वाटप होत होते. मात्र पीओएस मशीनमुळे प्रचंड वेळ लागत असल्याने ही नवी पध्दत दुकानदार व लाभार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
ग्रामीण भागात टू-जी यंत्रणेचे टॉवर
ग्रामीण भागात बीएसएनएल व इतर कंपन्यांनी टॉवर उभारले आहेत. यातील बहुतांश टॉवर टू-जी यंत्रणेचे आहेत. टू-जी यंत्रणेचे टॉवर सुध्दा इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देतात. मात्र त्यांची गती अतिशय कमी राहते. ग्राहकाने पीओएस मशीनवर थम्ब मारल्यानंतर सदर थम्ब व आधार कार्ड यांची आयडेंटी ओळखली जाते. आधार कार्डवरील थंब ग्राहकाने मारलेला थम्ब जोडणे आवश्यक आहे. ही सर्व प्रक्रिया इंटरनेटच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. यासाठी इंटरनेटची गती अधिक असणे आवश्यक आहे. ज्या गावांमध्ये कव्हरेज पोहोचत नाही. त्या गावांमध्ये सदर मशीन केवळ देखावा ठरणार आहे. पीओएस मशीन काम करण्यासाठी गावात कव्हरेज उपलब्ध असणे आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जंगलव्यात भागात मात्र कव्हरेजची समस्या गंभीर आहे.
टॉवर बीएसएनएलचे, सीम मात्र आयडीआचे
गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात बीएसएनएल कंपनीचे टॉवर असल्याने या भागात बीएसएनएलचेच कव्हरेज आहे. मात्र या भागात वाटप करण्यात आलेल्या पीओएस मशीनला आयडीआ कंपनीचे सीम लावण्यात आले आहे. दुर्गम भागात आयडीआचे अजिबात टॉवर नाही. त्यामुळे या पीओएस मशीनला कव्हरेज कसा मिळणार हा प्रश्न आहे.