मुसळधार पावसाने जनजीवन ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 11:50 PM2018-08-20T23:50:35+5:302018-08-20T23:51:29+5:30

रविवारी रात्री व सोमवारी दिवसभर गडचिरोली जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर येऊन बहुतांश मार्गांवरील वाहतूक ठप्प पडली होती. दिवसभर पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

Due to heavy rains, life-threatening jam | मुसळधार पावसाने जनजीवन ठप्प

मुसळधार पावसाने जनजीवन ठप्प

Next
ठळक मुद्देशहरातील सखल भागांमध्ये साचले पाणी : जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अनेक मार्ग बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रविवारी रात्री व सोमवारी दिवसभर गडचिरोली जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर येऊन बहुतांश मार्गांवरील वाहतूक ठप्प पडली होती. दिवसभर पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर सुरूच होता. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गडचिरोली - गडचिरोली शहरात सोमवारी दुपारी १ वाजतानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत मुसळधार पाऊस कोसळतच होता. त्यामुळे कन्नमवार नगर, आयटीआय परिसर, स्नेहनगर वॉर्ड, सोनापूर कृषी केंद्र, रामनगर, अयोध्यानगर, गोकुलनगर यांच्यासह सखल भागात पाणी साचले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले. दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नागरिक घराच्या बाहेर पडले नाही. परिणामी शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत होता. ग्राहक नसल्याने काही दुकानदारांनी सायंकाळी ७ वाजताच दुकाने बंद केली.
गोमणी - मुलेचरा तालुक्यातील गोमणी परिसरात पहाटे ४ वाजेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. गोमणी व आंबटपल्ली नाल्याच्या पुलावर दोन फूट पाणी चढले होते. दोन्ही बाजूने वाहनांची मोठी रांग लागली होती.
एटापल्ली - आलापल्ली-आष्टी मार्गावरील चौडमपल्ली-लगाम दरम्यान एक मोठा झाड पडला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. प्रवाशांनी पैसे गोळा करून गावकऱ्यांच्या हाताने झाड तोडले. एटापल्ली-आलापल्ली मार्गावर अनेक झाडे वाकली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने ते तोडावे, अशी मागणी होत आहे. खमनचेरू ते आलापल्ली मार्गावरील बोरीजवळील दिना नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती.
जिमलगट्टा - जिमलगट्टा परिसरातील किष्टापूर नाल्याला पूर आल्याने या परिसरातील देचलीपेठा, शेडा, शिंदा, येलाराम, दोडगेर, आसली, मुकनपल्ली या गावांचा संपर्क तुटला आहे. किष्टापूर नाल्यातील पाणी गावात शिरल्याने अनेक नागरिकांचे नुकसान झाले. रोशा वेलादी यांच्या ३० बकऱ्या नाल्यात वाहून गेल्या. नाल्याशेजारील पिके उद्ध्वस्त झाली.
देसाईगंज - देसाईगंज शहरात सोमवारी दिवसभर पाऊस कोसळत असल्याने भुयारी मार्गामध्ये पाणीच पाणी जमा झाले होते. तसेच आंबेडकर विद्यालयाच्या आवारातही पाणी जमा झाले होते. देसाईगंज-एकलपूर-कुरखेडा मार्गावर पाणी जमा झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. वनपरिक्षेत्र कार्यालयास पाण्याने वेढले होते.
विसोरा - देसाईगंज तालुक्यातील विसोरा, शंकरपूर भागात दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत होता. नदी, नाले तुडूंब भरून वाहत होते. पावसामुळे धानपिकाला मात्र दिलासा मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांचे रोवणीची कामे थांबली होती, अशी शेतकºयांची रोवणीची कामे सुरू झाली आहेत.
लखमापूर बोरी - चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी ते हळदी माल नाल्यावरील पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत होते. जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता.
आष्टी - आष्टी परिसरातही दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. आष्टी शहरातील अनेक सखल भागांमध्ये पावसाचे पाणी जमा झाले होते.
आलापल्ली - आलापल्ली येथील गोलकर मोहल्ला, बजरंग चौक, श्रीराम चौक, रमाबाई वॉर्ड, वनविकास महामंडळ वसाहत, आलापल्ली तलाव परिसरातील काही घरे पुन्हा पाण्याने बुडली. यापूर्वीही १५ आॅगस्ट रोजी या परिसरातील जवळपास ३०० घरे पाण्यात बुडली होती. मागील पाच दिवसांत दोनवेळा घरांमध्ये पाणी शिरल्याने दैनंदिन वापराच्या वस्तूंचे नुकसान झाले. सकाळपासूनच पाऊस सुरू असल्याने आलापल्ली येथील काही शाळांना सुटी देण्यात आली होती. नागेपल्लीजवळील लक्ष्मण नाल्यावरून पाणी असल्याने अहेरी-आलापल्ली मार्ग बंद होता. लबानतांडा पुलावर पाणी असल्याने चंद्रपूर मार्ग बंद पडला होता. सिरोंचा, मुलचेरा, भामरागड मार्गावरील अनेक पुलांवर पाणी असल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
मुलचेरा - मुलचेरा तालुक्यातही दमदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी घरे कोसळल्याने वाहतूक ठप्प पडली होती. मुलचेरा-आष्टी मार्गावरील दिना नदीच्या पाणी चढल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
आरमोरी - आरमोरी शहरातही दमदार पाऊस झाला. शहरातील सखल भागात पाणी साचले होते.
भामरागड - पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी वाढून पुराचे पाणी भामरागड शहरात शिरले. मागील १५ दिवसांत तीन वेळा भामरागड शहराला पुराच्या पाण्याने वेढले आहे. सकाळपासूनच पर्लकोटा नदीपुलावर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. भामरागडला तिन्ही नद्यांनी वेढले असल्याने या तालुक्यातील १०० पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.
कोरची - कोरची-कुरखेडा मार्गावर झाड पडल्यानेही वाहतूक ठप्प झाली होती. या मार्गावरील नाल्यांवर पाणी जमा झाले होते.

Web Title: Due to heavy rains, life-threatening jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस