अवैध अतिक्रमणामुळे वनजमिनीचे क्षेत्र होतेय कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:08 AM2019-04-22T00:08:35+5:302019-04-22T00:09:03+5:30
तालुक्याच्या बारसेवाडा, चंदनवेली तसेच जारावंडी, दोलंदा परिसरात वनजमिनीवर अतिक्रमण करून ही जमीन शेती कामासाठी वापरली जात आहे. काही ठिकाणी शेततळे व शेतबोडीसाठीही जंगल तोडून वनक्षेत्र कमी केले जात आहे. परिणामी गेल्या काही वर्षांपासून वनजमिनीचे क्षेत्र कमी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : तालुक्याच्या बारसेवाडा, चंदनवेली तसेच जारावंडी, दोलंदा परिसरात वनजमिनीवर अतिक्रमण करून ही जमीन शेती कामासाठी वापरली जात आहे. काही ठिकाणी शेततळे व शेतबोडीसाठीही जंगल तोडून वनक्षेत्र कमी केले जात आहे. परिणामी गेल्या काही वर्षांपासून वनजमिनीचे क्षेत्र कमी होत आहे. मात्र या प्रकाराकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे.
एटापल्ली तालुका हा घनदाट जंगलांनी व्यापलेला असून वर्षभर वनजमिनीवर अतिक्रमण केले जात आहे. अनेक शेतकरी आपल्या शेतालगतच्या जंगलातील झाडे तोडून आपले शेतजमिनीचे क्षेत्र वाढवत आहे. पूर्वी झाडाची साल काढून झाडाला मारले जात होते. त्यानंतर उभ्या झाडाच्या मुळाला आगही लावले जात होते. झाडाला आग लावल्यावर त्या झाडाचा लाकूड सुद्धा उपयोगात येत नाही. ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलॅन्ड यासारख्या आधुनिक यंत्राचा वापर करून एटापल्ली तालुक्यात वनजमिनीवर अतिक्रमण करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
जारावंडी-दोलंदा मार्गावर शेतजमीन वाहनासाठी सुद्धा मोठमोठी झाडे तोडले जात आहे. अनेक ठिकाणच्या वनजमिनीवर शेततळे खोदल्या जात असल्याने त्या ठिकाणची झाडे तोडल्या जात आहेत. बरेच शेतकरी वनजमिनीवर अतिक्रमण करतात. मात्र त्या जागेवर कोणत्याही पिकाची लागवड करीत नाहीत. अतिक्रमणामुळे जंगलातील मौल्यवान झाडे नष्ट होत असून जंगल धोक्यात सापडले आहे. वनविभागाने यावर ठोस उपाययोजना करून घनदाट जंगल वाचवावे, अशी मागणी काही सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.