पुरेशा बारदान्याअभावी धान शेतात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:43 AM2018-05-17T00:43:20+5:302018-05-17T00:44:30+5:30
आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देलनवाडी येथील रबी हंगामातील उन्हाळी धान खरेदी केंद्र ५ मे २०१८ रोजी सुरू झाले. तेव्हापासून महामंडळामार्फत धान खरेदीसाठी या केंद्रावर बारदाना पुरविण्यात आला नाही. त्यामुळे शेतकºयांचा धान मळणी करूनही शेतात पडून आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देलनवाडी येथील रबी हंगामातील उन्हाळी धान खरेदी केंद्र ५ मे २०१८ रोजी सुरू झाले. तेव्हापासून महामंडळामार्फत धान खरेदीसाठी या केंद्रावर बारदाना पुरविण्यात आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा धान मळणी करूनही शेतात पडून आहे.
आदिवासी विकास महामंडळाचे देलनवाडी येथील धान खरेदी केंद्र जिल्ह्यातील सर्वात मोठे केंद्र आहे. केंद्र सुरू झाल्यापासून या केंद्रावर शेतकरी विक्रीसाठी धान आणत आहेत. मागील खरीप हंगामातील बारदाना शिल्लक होता. या बारदान्याच्या भरवशावर आतापर्यंत खरेदी करण्यात आली, असे संस्थेचे व्यवस्थापक घोडमारे यांनी सांगितले. त्यानंतर आपण वरिष्ठांकडे बारदाना पुरविण्याबाबत मागणी केली आहे. सध्या मागील चार-पाच दिवसांपासून दररोज सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल होऊन अवकाळी वादळी पाऊस बरसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे संस्थेच्या व्यवस्थापकाने तत्काळ बारदान्याची मागणी करावी व महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बारदान्याचा पुरवठा करावा, अशी मागणी मानापूर, देलनवाडी येथील शेतकरी रामहरी चौधरी, भाईचंद गुरनुले, तेजराव लाखनकर, सुधाकर मेश्राम, हरबाजी घोडमारे, जीवन दडमल, व्यंकट चौधरी आदींनी केली आहे. आदिवासी विकास महामंडळांतर्गत उन्हाळी धान पिकासाठी आरमोरी, कुरखेडा, कोरची या तीन तालुक्यात प्रामुख्याने धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र त्यापूर्वी सदर केंद्रावर मागील हंगामातील किती बारदाना शिल्लक आहे व सध्याच्या हंगामात किती बारदान्याची आवश्यकता आहे.
सध्या आदिवासी विकास महामंडळाकडे ९५८ इतका बारदाना आहे. एवढा अल्प बारदाना पुरविणे सोयीचे होणार नाही म्हणून आम्ही तत्काळ २५ बारदान्यांची महामंडळाकडे मागणी केली आहे. प्रादेशिक व्यवस्थापक महत्वाच्या बैठकीसाठी बाहेर आहे. त्यांची मंजुरी मिळाल्याबरोबर देलनवाडी धान खरेदी केंद्राला बारदाना पुरविला जाईल. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ देणार नाही.
- एस. एल. राजुरे,
उप्रपादेशिक व्यवस्थापक,
आदिवासी विकास महामंडळ कार्यालय आरमोरी