खानसामांअभावी सिरोंचातील विश्रामगृह पडले ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 10:27 PM2017-12-23T22:27:11+5:302017-12-23T22:27:27+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील विश्रामगृहातील खानसामा राज्य विधीमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनानिमित्त तेथे कर्तव्यावर गेल्यामुळे सिरोंचातील विश्रामगृह ओस पडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील विश्रामगृहातील खानसामा राज्य विधीमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनानिमित्त तेथे कर्तव्यावर गेल्यामुळे सिरोंचातील विश्रामगृह ओस पडले आहे. नागपुरात गेलेले संबंधित खानसामा सिरोंचा येथे न परतल्याने सिरोंचातील विश्रामगृह बंदच असून सार्वजनिक विभागाने लावलेला बंदचा फलक अद्यापही दर्शनी भागावर कायम आहे.
पुढील आदेशापर्यंत विश्रामगृह बंद ठेवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी फलकातून केले आहे. सिरोंचा येथील साबांविचे हे विश्रामगृह ब्रिटीशकालीन असून ते १०० वर्षापूर्वीपासूनचे सुस्थितीत आहे. सिरोंचा येथे कालेश्वर दर्शनासाठी तसेच इतर कामासाठी विविध नागरिक व पर्यटक मोठ्या संख्येने येतात. सिरोंचा येथे इतरत्र निवासाची कोणतीही व्यवस्था नसल्याने पर्यटक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाकडेच सर्वप्रथम वळतात. मात्र खानसामाअभावी हे विश्रामगृह गेल्या १५ दिवसांपासून बंद असल्याने पर्यटकांची प्रचंड पंचाईत होत आहे.
खासगी विश्रामगृहापेक्षा या शासकीय विश्रागृहाचे भाडे कमी राहत असल्याने पर्यटकांची पसंती याच विश्रामगृहाला अधिक असते. शासकीय विश्रामगृहालगत बालाजी मंदिर असून समोरच्या भागात बगिचा आहे. चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ आदीसह संपूर्ण विदर्भातून पर्यटक मोठ्या संख्येने येथे हिवाळ्यात येत असतात. मात्र विश्रामगृह बंद असल्याने अनेक पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
खानसामाअभावी सदर विश्रामगृह बंद ठेवण्यास जबाबदार असणाºया संबंधित विभाग प्रमुखाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.