डिझेल खरेदीसाठी निधीअभावी जनरेटर पडले धूळ खात
By admin | Published: October 17, 2015 02:09 AM2015-10-17T02:09:52+5:302015-10-17T02:09:52+5:30
आदिवासी विकास विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यात विविध शाळा व वसतिगृह चालविले जातात.
विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास : सोलर वॉटर हीटरचेही झाले तुकडे
गडचिरोली : आदिवासी विकास विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यात विविध शाळा व वसतिगृह चालविले जातात. या शाळा व वसतिगृहांमध्ये विविध अडचणींचा सामना करीत विद्यार्थी राहत आहेत. शाळांना जनरेटर पुरविण्यात आले होते. मात्र यासाठी लागणाऱ्या डिझेलची तरतूद न झाल्याने हे जनरेटर धूळ खात पडून आहे. तर विद्यार्थ्यांच्या स्वयंपाकासाठी सोलर कुकर व वॉटर हीटर देण्यात आले होते. ते आता तुकडे होऊन भंगारात जमा झाले असल्याचे वास्तव उघड झाले आहे. आश्रमशाळा शिक्षक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेशचंद्र दहिवडे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध आश्रमशाळा व वसतिगृहांना भेटी दिल्यावर हे विदारक चित्र समोर आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, अहेरी, भामरागड हे तीन आदिवासी विकास प्रकल्प आहे. या प्रकल्पाअंतर्गत १०० वर अधिक शाळा जिल्ह्यात चालविल्या जातात. शाळा व विद्यार्थ्यांचे हित जोपासण्याऐवजी शाळांसाठी मोठ्या प्रमाणावर वस्तूची खरेदी करून सरकारी पैशाचा विनियोग करण्याचे हीत गेल्या काही वर्षांपासून जोपासले जात असल्याने खरेदी करण्यात आलेल्या अनेक वस्तू आता भंगारात जमा झाल्या असल्याचे दिसून येत आहे. मागील तीन वर्षांपूर्वी अनेक शाळांना जनरेटर पुरवठा करण्यात आले होते. जनरेटर चालविण्यासाठी लागणारे डिझेल खरेदी करण्याकरिता आर्थिक तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे हे जनरेटर आता धूळ खात पडून आहे. विद्यार्थी अंधारात अभ्यास करीत आहे. अनेक ठिकाणी या जनरेटरवर विद्यार्थ्यांनी कपडे वाळायला टाकल्याचे दिसून आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात ४५ शासकीय आश्रमशाळांना २० वर्षांपूर्वी ४० हजार रूपये किंमतीचे सोलर कुकर पुरविण्यात आले होते. एकाही आश्रमशाळेत एकही दिवस सोलर कुकरचा वापर करून स्वयंपाक करण्यात आला नाही. हे सोलर कुकर शाळेच्या अडगळीच्या खोलीत जमा झाले आहे. भंगारात किलोच्या भावाने हे सोलर कुकर विकले जाण्याच्या स्थितीत आहे. तीन वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांना आंघोळीकरिता गरम पाणी उपलब्ध व्हावे म्हणून सोलर वॉटर हीटर पुरविण्यात आले. या सोलर वॉटर हीटरचे तुकडे शाळेच्या छतावर आता पडून आहेत. वॉटर हीटर असो किंवा कुकर असो ते किलोच्या भावाने भंगारात विकण्याची तयारी शाळांनी केली असल्याचा आरोप प्रा. दहिवडे यांनी केला.