पशुधन पर्यवेक्षकाअभावी औषधीचा पुरवठा रखडला
By admin | Published: November 5, 2016 02:24 AM2016-11-05T02:24:54+5:302016-11-05T02:24:54+5:30
चामोर्शी तालुक्यातील घोट परिसरात असलेल्या चापलवाडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मागील सहा महिन्यांपासून पशुधन पर्यवेक्षकाचे पद रिक्त आहे.
चापलवाडातील स्थिती : पर्यवेक्षकाचे पद सहा महिन्यांपासून रिक्त
घोट : चामोर्शी तालुक्यातील घोट परिसरात असलेल्या चापलवाडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मागील सहा महिन्यांपासून पशुधन पर्यवेक्षकाचे पद रिक्त आहे. पशुधन पर्यवेक्षकाच्या सहीशिवाय जनावरांची औषधी उपलब्ध होत नाही. येथील पशुधन पर्यवेक्षकाचे मागील सहा महिन्यांपासून रिक्त असल्याने जनावरांच्या औषधीचा सुद्धा पुरवठा झाला नाही. त्यामुळे पशुपालक अडचणीत आले आहेत.
चापलवाडा परिसरातील बहुतांश नागरिकांकडे पशुधन आहे. चापलवाडा पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत चापलवाडा, मक्केपल्ली, चेक चापलवाडा, पलसपूर, गांधीनगर, वरूर, मक्केपल्ली, चक नं. १, मक्केपल्ली चक नं. ३, मक्केपल्ली चक नं. ४, पोतेपल्ली पॅच ही ११ गावे येतात. या ११ गावांमध्ये ३ हजार ८२९ गाय, २२१ म्हैस, १ हजार २२४ शेळ्या असल्याची नोंद पशुधन विभागाकडे उपलब्ध आहे. प्रत्यक्षात यापेक्षा जनावरांची संख्या अधिक आहे. जनावरांच्या देखभालीसाठी लाखो रूपये खर्चुन चापलवाडा येथे पशुवैद्यकीय दवाखाना बांधण्यात आला. मात्र या दवाखान्यातील पशुधन पर्यवेक्षकाचे पद मागील सहा महिन्यांपासून रिक्त आहे.
चापलवाडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे पर्यवेक्षक म्हणून डी. व्ही. नागोसे कार्यरत होते. त्यांचे हृदयविकाराने मे महिन्यात निधन झाले. तेव्हापासून या दवाखान्याला डॉक्टरच उपलब्ध झाले नाही. जनावरांसाठी घटसर्प, चौखुरा, एकटांग्या आदी आजारांचे औषध उपलब्ध होते. मात्र यासाठी पशुधन पर्यवेक्षकाची यासाठी असणे आवश्यक आहे. या दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षकाचे पद रिक्त असल्याने औषधही उपलब्ध झाली नाही. परिणामी पशुपालकांना शेकडो रूपये खर्चुन खासगी औषधीच्या दुकानातून औषधी खरेदी करावी लागत आहे. (वार्ताहर)