पुलावरील कठड्यांअभावी अपघाताचा धोका वाढला
By admin | Published: October 18, 2015 01:42 AM2015-10-18T01:42:54+5:302015-10-18T01:42:54+5:30
कुरखेडा-गेवर्धा या मुख्य मार्गावर असलेल्या पुलावर कठडे उभारण्यात येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
दुर्लक्ष : चोरट्यांनी केले कठडे लंपास
कुरखेडा : कुरखेडा-गेवर्धा या मुख्य मार्गावर असलेल्या पुलावर कठडे उभारण्यात येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून कठडे उभारावे, अशी मागणी होत आहे.
गेवर्धा-कुरखेडा मार्गावर तीन ते चार नाले आहेत. या नाल्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने चार वर्षांपूर्वी कठडे उभारले होते. मात्र अज्ञात चोरट्यांनी सदर कठडे लंपास केले होते. तेव्हापासून प्रशासनाने या पुलावर कठडे उभारणे बंद केले आहे. या मार्गावरून दरदिवशी हजारो चारचाकी, दुचाकी वाहने धावतात. त्याचबरोबर रात्रीच्या सुमारासही अनेक नागरिक प्रवास करतात. समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रकाशामुळे डोळे दिपकून एखादा वाहनधारक किंवा पायदळ व्यक्ती पुुलाच्या खाली कोसळण्याची शक्यता आहे. यापूर्वीही असे अनेक अपघात झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या पुलांवर कठडे बांधण्यासंदर्भात अनेक वेळा नागरिकांनी तक्रार केली आहे. मात्र अजूनपर्यंत या पुलांवर कठडे उभारले नाही. याकडे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)