नक्षल्यांच्या विरोधामुळेच दुर्गम भागाचा विकास खुंटला
By admin | Published: May 11, 2016 01:29 AM2016-05-11T01:29:26+5:302016-05-11T01:29:26+5:30
दुर्गम भागात पूल, रस्ते निर्मितीस व शिक्षणाच्या प्रसारास नक्षल्यांचा कायम विरोध राहिला आहे. त्यामुळे
भामरागड : दुर्गम भागात पूल, रस्ते निर्मितीस व शिक्षणाच्या प्रसारास नक्षल्यांचा कायम विरोध राहिला आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या ६९ वर्षानंतरही नेलगुंडा व परिसराचा विकास थांबला आहे. विकासासाठी पूल, रस्ते व शिक्षण महत्त्वाचे असल्याने या बाबींना नक्षल्यांनी विरोध करू नये, असे नक्षल्यांना ठणकाऊन सांगा, असा सूर नेलगुंडा येथे १० मे रोजी पार पडलेल्या नदी, नाला, पूल विकास परिषदेत उमटला.
भामरागड तालुक्यातील छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त भागात असलेल्या नेलगुंडा गावात भूमकाल संघटनेतर्फे नदी, नाला, पूल विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी नक्षलवादावर विचारमंथन करण्यात आले.
परिषदेला छत्तीसगडचे के. मधुकरराव, ओडिशाचे भारतभूषण, ज्येष्ठ गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते श्याम पांढरीपांडे, दत्ता शिरके, प्रा. अरविंद सोवनी, प्रा. रश्मी पारसकर, प्रा. श्रीकांत भोवते, प्रा. मिलींद तुळसे आदी विचारवंत उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते श्याम पांढरीपांडे यांनी लोकशाहीमध्ये एकत्र आल्याशिवाय विकास होत नसतो, असे प्रतिपादन केले. जर एखादा समाज निर्भयपणे समोर येत असेल तर त्याचा विकास कुणीच थांबवू शकत नाही, असे मार्गदर्शन केले. भूमकाल संघटनेचे सहसचिव प्रा. अरविंद सोवनी यांनी भामरागड तालुक्याला नद्या, नाल्यांचा तालुका संबोधूून अत्यंत आवश्यक असलेल्या पुलांचा पाढा वाचला. जुव्वी नाला, लाहेरी-होडरी नदी, गुंडेनहोड नाला, भुसेवाडा नाला, नेलगुंडा, कवंडे, बेजूर, कुमारगुडा आदी ठिकाणी पूल नसल्यामुळे स्थानिक माडिया समाजाचा विकास रखडला असल्याचे प्रतिपादन प्रा. अरविंद सोवनी यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
नक्षल्यांच्या विरोधानंतरही शेकडोंची उपस्थिती
४नेलगुंडा येथील परिषद यशस्वी होऊ नये, यासाठी परिषदेच्या पहिल्याच दिवशी ९ मे रोजी तेंदूपत्ता तोडणी सुरू व्हावी, यासाठी नक्षल्यांनी दबाव टाकला होता. त्याचबरोबर या परिषदेला उपस्थित न राहण्याचा दमही सभोवतालच्या नागरिकांना भरला होता. मात्र नक्षल्यांना न जुमानता परिषदेला नेलगुंडा, गोंगवाडा, मिडदापल्ली, पारायनार, ईरपनार, भटपार, कवंडे, जुव्वी, गोलागुडा, भुसेवाडा येथील शेकडो नागरिक उपस्थित होते.