धान उत्पादनात हेक्टरी तीन क्विंटलची घट

By admin | Published: November 13, 2014 11:01 PM2014-11-13T23:01:13+5:302014-11-13T23:01:13+5:30

उशीरा झालेली रोवणी, अपुरा पाऊस व धानपिकावर विविध रोगांचा झालेला प्रादुर्भाव यामुळे यावर्षी धानाच्या उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत हेक्टरी तीन क्विंटलची घट होईल,

Due to the reduction of three quintals of hectare in paddy production | धान उत्पादनात हेक्टरी तीन क्विंटलची घट

धान उत्पादनात हेक्टरी तीन क्विंटलची घट

Next

शेतकरी हवालदिल : नजरअंदाज पाहणीचा निष्कर्ष
गडचिरोली : उशीरा झालेली रोवणी, अपुरा पाऊस व धानपिकावर विविध रोगांचा झालेला प्रादुर्भाव यामुळे यावर्षी धानाच्या उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत हेक्टरी तीन क्विंटलची घट होईल, असा निष्कर्ष कृषी विभागाने नुकत्याच केलेल्या नजर अंदाज पाहणीवरून काढला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील जमीन व वातावरण धान उत्पादनासाठी पोषक असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. एकूण शेती उत्पादनाच्या धानपिकाचा वाटा सुमारे ८० टक्केहून अधिक आहे. २०१४-१५ च्या खरीप हंगामात कृषी विभागाने १ लाख ५१ हजार ८१० हेक्टरवर धानपिकाची लागवड करण्याचे नियोजन केले होते. मात्र प्रत्यक्षात १ लाख ४५ हजार १३५ हेक्टरवर धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये १ लाख २ हजार ५२५ हेक्टरवर धानपिकाची रोवणी तर ४२ हजार ६१० हेक्टरवर आवत्या पद्धतीने धानपिकाची लागवड करण्यात आली. मागील वर्षीच्या हंगामात हेक्टरी १ हजार ५४१ क्विंटल तांदळाचे उत्पादन झाले होते. वेळेवर शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे, कीटकनाशके उपलब्ध करून दिले जाणार असल्याने कृषी विभागाने हेक्टरी १ हजार ६५० क्विंटल तांदळाचे उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार कृषी विभागाने योग्य नियोजनही केले होते.
कृषी विभागाचे व शेतकऱ्यांचे नियोजन योग्य असले तरी पावसाने मात्र सुरूवातीपासूनच धक्के देण्यास सुरूवात केली. पहिला पाऊस तब्बल १५ दिवसांनी उशीरा पडला. त्यानंतर पावसाने एक महिना दडी मारली. पहिल्या पावसात काही शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. त्यांची पऱ्हे पावसाअभावी करपली. तर काही शेतकरी मात्र पऱ्हे टाकण्यासाठी पावसाची वाटच पाहत होते. पऱ्हांमुळे धानाची रोवणी तब्बल दीड महिना उशीराने झाली. याचा साहजीक परिणाम धानाच्या उत्पादनावर पडला. त्यानंतरही पाऊस फार जोर धरू शकला नाही. तलाव व बोड्यांमध्ये अर्धाच जलसाठा असतांना पावसाने कायमची दडी मारली. धानपीक गर्भात असतांनाच तलाव व बोडी पूर्णपणे आटल्याने धानपीक करपायला लागले. आटापीटा करूनही अनेक शेतकऱ्यांच्या हातातून धानपीक गेले. काही शेतकऱ्यांनी सिंचनाची पर्यायी व्यवस्था केल्यानंतर जवळपास अर्धे उत्पादन त्यांच्या हाती लागले. तर काही भागात मावा, तुडतुडा या रोगांनी धानपिकावर हल्ला चढविला. शर्तीचे प्रयत्न करूनही रोगांपासून धानपिकाला वाचविता आले नाही.
कृषी विभागाने नुकतीच नजर अंदाज पाहणी केली आहे. या पाहणीवरून या पाहणीवरून यावर्षी जिरायती धानाचे उत्पादन हेक्टरी १३ क्विंटल तांदूळ तर बागायती धानाचे उत्पादन हेक्टरी १७ क्विंटल तांदूळ एवढे होणार आहे. दोघांचीही सरासरी पकडल्यास हेक्टरी १४ क्विंटल तांदळाचे उत्पादन होणार आहे. मागील वर्षी धानाचे उत्पादन सरासरी १५ क्विंटल ४१ किलो तांदूळ झाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी हेक्टरी दीड क्विंटल तांदळात घट होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. धान आणि तांदळाचे प्रमाण १०० मागे ५० ते ५५ असे राहत असल्याने धानाच्या उत्पादनात हेक्टरी ३ क्विंटल होण्याची शक्यता वर्तविली आहे.
सोयाबीन पिकानंतर धानपिकानेही साथ दिली नसल्याने शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, असा गहण प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. काही भागात दुष्काळी परिस्थिती असल्याने शासनाने दुष्काळ जाहीर करावा, अशीही मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Web Title: Due to the reduction of three quintals of hectare in paddy production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.