रस काढण्याने सिंधीच्या झाडांचे अस्तित्व धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 11:01 PM2018-05-14T23:01:25+5:302018-05-14T23:01:41+5:30
सिंधीच्या झाडाला छिद्र पाडून त्यातून रस काढला जातो. यामुळे सदर झाड काही वर्षातच करपून जाते. अशी आजपर्यंत जिल्हाभरातील हजारो सिंधीची झाडे नष्ट झाली आहेत.
प्रदीप बोडणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : सिंधीच्या झाडाला छिद्र पाडून त्यातून रस काढला जातो. यामुळे सदर झाड काही वर्षातच करपून जाते. अशी आजपर्यंत जिल्हाभरातील हजारो सिंधीची झाडे नष्ट झाली आहेत. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास सिंधीच्या झाडाचे अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोकणात नारळाचे झाड जसे निसर्ग व समुद्र किनाऱ्याचे सौंदर्य खुलवते. गडचिरोली जिल्ह्यातील शेतशिवारात नारळाच्या झाडाप्रमाणे दिसणारे सिंधीचे झाड आढळून येते. सदर झाड येथील वन वैभवात अधिकची भर टाकत आहे. मात्र या झाडाचे अस्तित्व आता धोक्यात आल्याचे दिसून येते.
हिवाळ्याच्या कालावधीत सिंधीच्या झाडामधून रस निघतो. यासाठी झाडाच्या वरच्या टोकावरील फांद्या तोडून त्या ठिकाणी छिद्र पाडला जातो. तोटीद्वारे रस एका हंडीमध्ये जमा केले जाते. सिंधीचे रस पेणारे काही शौकीन गावात असल्याने त्यांना या रसाची विक्री केली जाते. दिवसेंदिवस सिंधीचे रस विकण्याचा धंदा जोरात सुरू आहे. अधिकचे रस निघावे, यासाठी दरवर्षी फांद्या तोडून छिद्र पाडले जाते. मात्र यामुळे सदर झाड चार ते पाच वर्ष रस काढल्यानंतर कायमचे करपून जाते. अशा पध्दतीने वैरागड परिसरातील शेकडो सिंधीची झाडे करपली आहेत. विशेष म्हणजे, सिंधीचे झाड पूर्णपणे परिपक्व होण्यासाठी बराच मोठा कालावधी लागतो. ३० ते ४० वर्षांचे झाड रस काढण्यासाठी तयार होते. वैरागड परिसरातील विहिरगाव, कुकडी, मानापूर, देलनवाडी, या परिसरात सध्या सिंधीच्या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र रस काढण्यामुळे या झाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याबाबत वैरागडचे वनरक्षक श्रीकांत सेलोटे यांना विचारणा केली असता, बाभूळ आणि सिंधीचे झाड खासगी शेतात आढळते. त्यामुळे सिंधी काढणाºयांवर कोणतीही कारवाई वन विभाग करू शकत नाही, अशी माहिती दिली.