रस्ता बांधकामामुळे माजी जि.प. अध्यक्ष वांद्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 05:00 AM2020-06-10T05:00:00+5:302020-06-10T05:00:38+5:30
एटापल्ली उपविभागांतर्गत भामरागड तालुक्यात झालेल्या विविध कामांमध्ये गडबड झाल्याची तक्रार जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्यानंतर जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार भामरागडचे गटविकास अधिकारी स्वप्नील मगदूम यांनी विस्तार अधिकारी (पंचायत) व्ही.जी. देव्हारे व इतर साक्षीदारांना घेऊन त्या कामांची तपासणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत एटापल्ली उपविभागात करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामात अनेक ठिकाणी गडबड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांच्या नावावर असलेल्या कंत्राटासाठी काम पूर्ण न करताच लाखो रुपयांच्या बिलाची वसुली केल्याचे दिसून आल्याने जिल्हा परिषदेच्या वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.
एटापल्ली उपविभागांतर्गत भामरागड तालुक्यात झालेल्या विविध कामांमध्ये गडबड झाल्याची तक्रार जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्यानंतर जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार भामरागडचे गटविकास अधिकारी स्वप्नील मगदूम यांनी विस्तार अधिकारी (पंचायत) व्ही.जी. देव्हारे व इतर साक्षीदारांना घेऊन त्या कामांची तपासणी केली. त्यात मोठ्या प्रमाणावर गडबड असल्याचे स्पष्ट झाले.
मडवेली ते सिपनपल्ली या पांदण रस्त्याच्या बांधकामाची पाहणी केली असता, कुठेही मातीकाम व खोदकाम झालेले किंवा मुरूमाचे काम झालेले नसल्याचे सदर अधिकाऱ्यांना दिसून आले. मात्र या कामासाठी कंत्राटदार कुत्तरमारे यांनी ३१ लाख ५ हजार ६१ रुपयांचे बिल वसुल केले आहे.
हिंदेवाडा ते पिटेकसा या रस्त्याचे आदिम विकास योजनेतून बांधकाम सुरू आहे. सदर रस्ता ८०० मीटर लांबीचा असून त्यावर कुठेही स्लॅब ड्रेनचे बांधकाम झालेले किंवा चालू असल्याचे पंचनामा करणाºया अधिकाऱ्यांना आढळले नाही. त्या रस्त्यावर केवळ मातीकाम झालेले आहे. तसेच अंदाजे ३०० मीटर रस्त्यावर मुरूमकाम होऊन त्याची दबाई झाली आहे. ३०० मीटर रस्त्यावर ट्रॅक्टरद्वारे मुरूम आणून ठेवल्याचे आढळून आले. याशिवाय शिल्लक २०० मीटर रस्त्यावर फक्त मातीकाम झाल्याचे आढळले. मात्र या कामासाठी कुत्तरमारे यांना ३६ लाख ६६ हजार ५८० रुपयांचे बिल देण्यात आले आहे.
याच पध्दतीने हिंदेवाडा ते इरकनार मार्गावर मोरी बांधकाम करण्याचा कंत्राट कुत्तरमारे यांच्याकडे आहे. या मार्गावर ज्या ठिकाणी नाला तुटलेला आहे, त्या ठिकाणी कोणतेही काम चालू असल्याचे किंवा पूर्ण झाल्याचे दिसून आले नाही. या ठिकाणी कोणतेही बांधकाम किंवा खोदकाम झाल्याचे आढळले नाही. तरीही या कामासाठी १ लाख ८६ हजार ९९० रुपयांचे बिल देण्यात आले आहे.
करारनाम्यापेक्षा अधिकच्या रकमेचे बिल अदा
विशेष म्हणजे, प्रशांत कुत्तरमारे यांना मिळालेल्या कंत्राटाची करारनाम्यानुसार रक्कम कमी असताना प्रत्यक्षात मात्र त्यापेक्षा जास्त रकमेचे बिल देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यासह सदर बिल मंजूर करणारे अधिकारीही अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मडवेली-सिपनपल्ली रस्त्याच्या कामाची किंमत करारनाम्यानुसार २७ लाख ७५ हजार रुपये आहे. मात्र काम अपूर्ण असताना ३१ लाखांचे बिल देण्यात आले.
हिंदेवाडा, पिटेकसा मार्गाची करारनामा किंमत २७ लाख ७५ हजार असताना आणि काम अपूर्ण असताना प्रत्यक्षात ३६ लाख ६६ हजार रुपयांचे बिल देण्यात आले. जि.प. बांधकाम विभागाच्या या कामांचे बिल सादर करताना प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाचे फोटो लावून बिल मंजूर करवून घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे याप्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले.