मलकापुरात भीषण पाणीटंचाई
By admin | Published: April 15, 2017 01:42 AM2017-04-15T01:42:13+5:302017-04-15T01:42:13+5:30
तालुक्यातील अडपल्ली माल ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मलकापूर येथे मागील आठवडाभरापासून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे.
हातपंपातील जलपातळी खालावली : सौर ऊर्जेची पाणी योजनाही बंद अवस्थेत
मुलचेरा : तालुक्यातील अडपल्ली माल ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मलकापूर येथे मागील आठवडाभरापासून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. गावातील दोन हातपंपातील जलपातळी खालावली असून येथील सौरऊर्जेवरील नळयोजनाही बंद अवस्थेत आहे.
अडपल्ली गट ग्रामपंचायत अंतर्गत सहा गावांचा समावेश होतो. या गावांपैैकी मलकापूर गाव आहे. या गावाची लोकसंख्या अडीच हजारावर आहे. लोकसंख्येच्या मानाने येथे केवळ दोन हातपंप आहेत. तसेच २००८ मध्ये जलस्वराज्य योजनेतून ६८ हजार रूपयांचा खर्च करून सौरऊर्जेवरील नळ योजना कार्यान्वित करण्यात आली होती. या योजनेंतर्गत गावात पाण्याची टाकी व पाईपही टाकण्यात आले. काही दिवस सुरळीत पाणी पुरवठा झाला. मात्र काही दिवसांतच नळ योजना बंद पडली. अडीच हजारावर लोकसंख्या असतानाही गावात केवळ दोन हातपंप आहेत. सध्या या हातपंपातील जलस्तर घटलेला आहे. त्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पहाटेपासूनच नळावर गर्दी करावी लागते. सौर ऊर्जेवरील नळ योजनेंतर्गत ८०० लोकांना कनेक्शन देण्यात आले आहे. त्यामुळे या नळ योजनेवर गावातील नागरिक अवलंबून आहेत. परंतु नळ योजना बंद असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.
गावातील बंद पडलेली सौर ऊर्जेवरील नळ योजना तत्काळ सुरू करावी, अशी मागणी रमेश कन्नाके, पत्रू सिडाम, देवेंद्रसिंह, कालिदास भोयर, बंडू सिडाम, राजू दुगे यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
दोन वर्षांपासून मोटारची दुरूस्ती नाही
मलकापूर येथे सौर ऊर्जेवरील नळ योजनेच्या पाणी टाकीलगत मोटार बसविण्यात आली. परंतु अल्पावधीतच मोटार नादुरूस्त झाली. त्यामुळे सदर मोटार दुरूस्तीसाठी पुणे येथे पाठविण्यात आली. दोन वर्षांपासून मोटारची दुरूस्ती अद्यापही झाली नाही. या संदर्भात अडपल्ली मालचे सरपंच व ग्राम सचिवांनी सांगितले की, सौर ऊर्जा पाणी योजनेची मोटार खराब झाल्याने सदर मोटार दुरूस्तीसाठी पाठविण्यात आली आहे. परंतु दोन वर्षांपासून अद्यापही मोटारची दुरूस्ती का झाली नाही, असा सवाल येथील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाला केला आहे. प्रशासनाने लक्ष घालून सौर ऊर्जेवरील नळ योजना तत्काळ सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.