तेलगू फलकामुळे कालेश्वरात मराठी भाविकांची कुचंबणा
By admin | Published: December 30, 2015 02:01 AM2015-12-30T02:01:12+5:302015-12-30T02:01:12+5:30
दीडशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या सिरोंचा तालुक्यातील आरडा गावात मल्लिकार्जुन यात्रेला प्रारंभ झाला आहे.
मराठी, हिंदी फलक लावण्याची मागणी : कालेश्वरात जमली भक्तांची मांदियाळी
रमेश मारगोनवार सिरोंचा
दीडशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या सिरोंचा तालुक्यातील आरडा गावात मल्लिकार्जुन यात्रेला प्रारंभ झाला आहे. मात्र कालेश्वर मंदिर व मंदिर परिसरात यात्रेदरम्यान लावण्यात आलेले सारेच फलक तेलगू भाषेत असल्याने या यात्रेत सहभागी होण्यासाठी आलेल्या शेकडो मराठी भाविकांची कुचंबणा होत आहे. याबाबत मंदिर व्यवस्थापनाकडे तक्रार नोंदविल्यावर त्यांनी यापुढे हिंदी भाषेत फलक लावण्यास होकार दर्शविला आहे.
तेलंगणा राज्यातील कालेश्वर परिसरात यात्रेला तेलंगणा, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र राज्यातून शेकडो भाविक येतात. दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुण्यक्षेत्र कालेश्वर येथे महाराष्ट्रातूनही हजारो हिंदी, मराठी भाषीक भाविक जातात. गोदावरी नदी ओलांडताच मंदिर परिसराला सुरुवात होते. यात्राकाळात भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध फलक येथे लावले जातात. पूजा विवरण व माहिती देणारेही फलक यात असतात. मात्र हे सारे फलक तेलगू भाषेत असल्याने मराठी भाविकांची मोठी कुचंबना यात्राकाळात होते. मराठी भाविकांचा यात्रेत सहभाग राहत असतानाही फलक मात्र तेलगूत असल्याने योग्य माहिती त्यांना मिळत नाही. त्यामुळे अनेकांची गैरसोय होते.
इंग्रजी, हिंदी भाषेत सुद्धा येथे फलक लावले जात नाही. त्यामुळे आणखीनच भर पडते. ही बाब मंदिर व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. पुढील वेळेपासून याचा विचार करून हिंदी भाषेत फलक लावू असे आश्वासन व्यवस्थापनाने दिले आहे.