मतदानामुळे बसस्थानक परिसरात शुकशुकाट, बसगाडयाही माेजक्याच
By दिलीप दहेलकर | Published: November 20, 2024 03:24 PM2024-11-20T15:24:32+5:302024-11-20T15:25:47+5:30
बसथांबेही ओस : सर्वत्र निवडणुकीचीच लगबग
गडचिराेली : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी गडचिराेली शहरातील मतदारांमध्ये केंद्रांवर उत्साह दिसून आला. या निवडणुकीच्या कामासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिराेली आगाराच्या बहुतांश बसगाडया अधिग्रहीत करण्यात आल्याने बुधवारला माेजक्याच बसगाडया उभ्या हाेत्या. प्रवाशांची संख्याही राेडावलेलीच हाेती. प्रवाशी थांबेही ओस पडले हाेते.
विधानसभा निवडणुकीसाठी गडचिराेली शहर व तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या हाेत्या. विशेष म्हणजे गाेगाव व अमिर्झा परिसरात मतदारांमध्ये सकाळपासूनच उत्साह दिसून आला. गडचिराेली शहरातील चामाेर्शी, आरमाेरी व चंद्रपूर मार्गावरील बसथांब्यावर फारसे प्रवाशी आढळून आले नाही. नागरिक मतदानासाठी केंद्रांवर गेल्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या राेडावल्याचे दिसून आले.
मतदानाच्या दिवशी बुधवारला प्रवाशी वाहतुकीवर खाजगी बसेस तसेच टॅक्सी अतिशय कमी हाेत्या. परिणामी प्रवाशांना महामंडळाच्या लालपरीची बराच वेळ प्रतिक्षा करावी लागली. धानाेरा मार्गावरील बस आगारामध्ये दुपारच्या सूमारस एकच बसगाडी फलाटावर लागल्याचे दिसून आले. गडचिराेली आगाराच्या जवळपास ६६ बसेस निवडणुकीच्या कामावर पाठविण्यात आल्याने प्रवाशांसाठी बसेसचा तुटवडा पडल्याचे दिसून आले.