वृक्षतोडीमुळे विदर्भातील रेशीम शेती धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 11:09 AM2018-11-14T11:09:19+5:302018-11-14T11:10:37+5:30
: टसर रेशीम (कोसा) शेती करण्याचे तंत्र विकसित झाल्यामुळे या शेतीचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढले असले तरी दिवसेंदिवस ही शेती करण्यासाठी जंगल मिळत नसल्याने या शेतीचा विस्तार थांबला आहे.
प्रदीप बोडणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : टसर रेशीम (कोसा) शेती करण्याचे तंत्र विकसित झाल्यामुळे या शेतीचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढले असले तरी दिवसेंदिवस ही शेती करण्यासाठी जंगल मिळत नसल्याने या शेतीचा विस्तार थांबला आहे. तसेच जुना जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने रेशीम शेतीच धोक्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, कुरखेडा, देसाईगंज व गडचिरोली या चार तालुक्यांमध्ये जवळपास एक हजार हेक्टरवर रेशीम उत्पादनाची शेती केली जाते. रेशीम तयार करणाऱ्या किटकांचे संगोपन येन, आजन व तुती या झाडांवर केले जाते. गडचिरोली जिल्ह्यात या झाडांची संख्या पूर्वी मोठ्या प्रमाणात होती. रेशीम किड्याला हिरवा पाला पोषक राहत असल्याने दरवर्षी या झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. त्यामुळे या झाडांची वाढ खुंटली आहे तर काही झाडे करपली आहेत. करपलेल्या झाडांच्या जागेवर नवीन झाडांची लागवड करणे आवश्यक असताना रेशीम उत्पादन करणाºया नागरिकांच्या संस्थांनी याकडे साफ दुर्लक्ष केले. त्याचबरोबर वनतस्करांकडूनही झाडांची तोड सुरूच आहे. परिणामी झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.
मागील दहा वर्षात रेशीम शेतीमध्ये अनेक संशोधन होऊन शेती करण्याचे नवीन तंत्र उपलब्ध झाले आहे. शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी आरमोरी येथे टसर रिलिंग केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राच्या वतीने रेशीम शेतीसाठी आवश्यक असलेली नवीन यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र रेशीम उत्पादनात अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या झाडांची संख्या कमी होत चालल्याने रेशीम शेती धोक्यात येण्याची शक्यता आहे.
या शेतीवर भोई समाजाच्या हजारो कुटुंबांचा प्रपंच चालत आहे. मात्र ही शेती बुडाल्यास हे सर्व कुटुंब उघड्यावर पडणार आहेत.