दुचाकीसह नदीत बुडून जावई-सासऱ्याचा मृत्यू, लोखंडी पुलावरून तोल गेल्याने घात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 07:33 PM2019-02-16T19:33:33+5:302019-02-16T19:33:44+5:30
अहेरी तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावर असलेल्या वांगेपल्लीनजीकच्या प्राणहिता नदीपात्रात दुचाकी कोसळून जावई व सास-याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अहेरी (गडचिरोली) : अहेरी तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावर असलेल्या वांगेपल्लीनजीकच्या प्राणहिता नदीपात्रात दुचाकी कोसळून जावई व सास-याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. दिनकर रेड्डी पोरेड्डीवार (४८) रा. कागजनगर (तेलंगणा) आणि बापुराव येमनुरवार (६५), रा.अहेरी अशी मृतांची नावे आहेत.
दिनकररेड्डी पोरेड्डीवार हे आपल्या नातेवाईकडील वास्तूपुजनासाठी अहेरी येथे आले होते. शुक्रवारी कार्यक्रम आटोपून ते कागजनगरकडे परत जाणार होते. त्यावेळी त्यांचे सासरे बापूराव यमनूरवार यांनी आपल्या मुलीच्या भेटीसाठी आपल्या जावयासोबत येण्याची इच्छा दर्शविली. दुपारी १ वाजताच्या सुमारास जावई दिनकर रेड्डी पोरेड्डीवार व सासरे बापूराव यमनूरवार हे एमएच ३३ के ३१६८ क्रमांकाच्या दुचाकीने काजगनगरकडे निघाले. प्राणहिता नदीवर मोठ्या पुलाचे काम सुरू असल्याने खालच्या बाजूने उभारलेल्या तात्पुरत्या स्वरूपाच्या लोखंडी पूलावरून ते दुचाकीने जात होते. दरम्यान या पुलावरून तोल गेल्याने त्यांची दुचाकी खाली कोसळली व दोघांचाही नदीत बुडून मृत्यू झाला.
दुपारी २.३० वाजताच्या सुमारास जावई दिनकर पोरेड्डीवार यांचा मृतदेह प्रवाहात पुढे तरंगताना दिसला. तसेच बापूराव यांचा मृतदेह दुपारी ४ वाजता तरंगताना दिसला. घटनेची माहिती मिळताच अहेरीचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधाकर कुमरे, पोलीस हवालदार बेगलाजी दुर्गे, रवींद्र चौधरी, रोहनकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्यातील दोन्ही मृतदेह बाहेर काढले. एकाच परिवारातील जावई आणि सासºयाचा बुडून मृत्यू झाल्याने नातेवाईकांवर शोककळा पसरली. दिनकर पोरेड्डीवार यांचा कागजनगर येथे फोटो स्टुडिओचा व्यवसाय होता. बापूराव यमनूरवार यांचा शेतीचा व्यवसाय होता.
-तर घटना घडलीच नसती
प्राणहिता नदीवर मोठ्या पुलाचे काम सुरू आहे. बाजूला वाहने ये-जा करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचा रस्ता बांधून व लोखंडी पूल लावण्यात आला आहे. मात्र हा लोखंडी पूल फक्त चार चाकी वाहने जाईल या बेताने मधुन जागा सोडलेला आहे. त्यामुळे तीनचाकी वाहन, दुचाकीधारकांना जीव धोक्यात टाकूनच प्रवास करावा लागतो. पूर्णव्याप्त लोखंडी पूल त्या ठिकाणी असता तर ही घटना घडली नसती. यापूर्वीही अहेरी येथील युवक याच लोखंडी पुलावरून दुचाकीने कोसळून नदीत पडून मरण पावला होता. या लोखंडी पुलाने आतापर्यंत तीन जणांचा बळी घेतला आहे.