बायोमेट्रिकच्या सक्तीने शाळांची गोची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:43 AM2018-07-12T00:43:46+5:302018-07-12T00:44:00+5:30

कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी नियमित वर्गाला उपस्थित राहावे, या उद्देशाने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे.

Due to the use of biometric force of schools | बायोमेट्रिकच्या सक्तीने शाळांची गोची

बायोमेट्रिकच्या सक्तीने शाळांची गोची

Next
ठळक मुद्देकारवाईचे संकेत : कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोंदवावी लागणार हजेरी

दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी नियमित वर्गाला उपस्थित राहावे, या उद्देशाने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची गडचिरोली जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामुळे कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील नियमित वर्गाला दांडी मारून कोचिंगच्या भरवशावर असणाऱ्या विद्यार्थ्यांसह संबंधित शाळा व संस्थांची गोची झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील बऱ्याच कनिष्ठ महाविद्यालयातील विशेष करून विज्ञान शाखेचे विद्यार्थी कॉलेजच्या नियमित वर्गांना उपस्थित न राहता केवळ प्रात्यक्षिक वर्गाला उपस्थित राहतात. नियमित वर्गाऐवजी कोचिंग क्लासेसमध्ये उपस्थित राहतात, असे वास्तव बऱ्याच जिल्ह्यांमध्ये उघडकीस आले. याशिवाय काही कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयांनी खासगी शिकवणी वर्गासोबत सामंजस्य करार केला आहे. अशा महाविद्यालयातील विद्यार्थी शिकविणी वर्गाला उपस्थित राहतात. मात्र कॉलेजच्या नियमित वर्गाला दांडी मारतात. अशा प्रकारच्या तक्रारी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या. या तक्रारींच्या अनुषंगाने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने १५ जून २०१८ रोजी नवा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयान्वये सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित व विनाअनुदानित विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने नोंदविणे सक्तीचे केले आहे.
या निर्णयाची गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात अंमलबजावणी सुरू झाली आहे. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी न करणाºया संबंधित विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची मान्यता काढून घेण्यासंदर्भात उचित कारवाई करण्यात येईल, असेही शिक्षण विभागाने निर्णयात म्हटले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद, आदिवासी विकास विभाग, समाजकल्याण विभाग, तसेच सर्व व्यवस्थापनाचे अनुदानित व विनाअनुदानित मिळून एकूण १६६ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या शिक्षणाची सुविधा आहे. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यात एकूण ३४५ माध्यमिक विद्यालये आहेत. यामध्ये आदिवासी विकास विभागाचे ४३ शासकीय, खासगी अनुदानित ४०, समाजकल्याणचे दोन, खासगी चार, अनुदानित १४६, विनाअनुदानित ७१ व १९ माध्यमिक विद्यालये स्वयंअर्थसहाय्यीत तत्त्वावर सुरू आहेत. या सर्वांना यापूर्वीच्या निर्णयानुसार विद्यार्थी व शिक्षकांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने नोंदविण्यास बाध्य केले आहे.
सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने नोंदविण्याची सक्ती करण्यात आली आहे. बायोमेट्रिक उपस्थिती सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून म्हणजे १५ जूनपासून एक महिन्याच्या आत उपलब्ध करून घ्यावी, असेही शालेय शिक्षण विभागाने म्हटले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाच्या सर्व शासकीय व खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात यापूर्वीच बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. अनुदानित १४६ पैकी १२० वर कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. विनाअनुदानित ७१ पैकी ४७ कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रिक प्रणाली सुरू करण्यात आली आहे. उर्वरित विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करण्याची कार्यवाही गतीने सुरू आहे. दोन ते तीन महिन्यानंतर या प्रणालीचा राज्य शासनातर्फे आढावा घेतला जाणार आहे. बायोमेट्रिक प्रणालीबाबत जि.प.शिक्षण यंत्रणेला सजग राहावे लागणार आहे.
नामधारी ज्युनिअर कॉलेज धोक्यात?
गडचिरोली जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात विज्ञान शाखेचे बरेच कनिष्ठ महाविद्यालये शिक्षक व विद्यार्थ्याविना नामधारीपणे सुरू आहेत. नामांकित कोचिंग क्लासेस इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांना बिनधास्तपणे पाठवून परीक्षेच्या वेळी केंद्रावर पाठविण्याचे काम संबंधित संस्थांकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. आता बायोमेट्रिक प्रणालीमुळे कॉलेजच्या नियमित वर्गाला विद्यार्थी उपस्थिती आवश्यक आहे. त्यामुळे असे कॉलेज धोक्यात येण्याची शक्यता आहे.
शिक्षकांना लागली शिस्त
शासन निर्णयानुसार २० टक्के अनुदान लागू केलेल्या माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांच्या बायोमेट्रिक नोंदीनुसार जि.प.माध्यमिक शिक्षण विभागाने शिक्षकांना वेतन अदा केले. काही महिन्यांपूर्वी बायोमेट्रिक नोंदी नसलेल्या संबंधित शाळांच्या शिक्षकांचे वेतन थांबविण्यात आले होते. या कारवाईमुळे माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांना शिस्त लागली असून त्यांच्यात नियमितपणा आला आहे.
शिक्षणाधिकारी करणार तपासणी
सर्व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील किती व कोणत्या महाविद्यालयातीन बायोमेट्रिक पद्धतीने विद्यार्थ्यांची हजेरी नोंदविली जात आहे. बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करून ती सुरू करण्यात आली आहे काय? याबाबतची तपासणी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व शिक्षण निरीक्षक करणार आहेत. तसेच जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांना आकस्मिक भेट देऊन बायोमेट्रिक उपस्थितीतींचा आढावाही शिक्षणाधिकारी वेळोवेळी घेणार आहेत.
शाळेच्या वेळेतील कोचिंग क्लासेसना बसणार फटका
गडचिरोली जिल्ह्यातील कला व वाणिज्य या शाखेतील इयत्ता ११ वी व १२ वीचे विद्यार्थी प्रवेश असलेल्या संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात नियमित जाऊन वर्गांना उपस्थिती दर्शवितात. मात्र विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा कल खासगी कोचिंग क्लासेसकडे अधिक असल्याने बरेच विद्यार्थी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील वर्गांना दांडी मारतात. विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून काही संस्थांनी कोचिंग क्लासेसचा व्यवसाय सुरू केला आहे. अशा कोचिंग क्लासेसमधील वर्ग हे कनिष्ठ महाविद्यालय भरण्याच्या वेळेतच घेतले जातात. अशा कोचिंग क्लासेसच्या वर्गांना बायोमेट्रिक प्रणालीच्या या निर्णयाने आता ब्रेक लागणार आहे. गडचिरोली शहर व जिल्ह्यात अनेक सुशिक्षित बेरोजगार खासगी शिकवणी घेऊन विद्यार्थ्यांना घडवित आहेत. शाळा सुटल्यानंतरच्या वेळेत सुशिक्षित बेरोजगार खासगी शिकवणी घेत आहेत. अशा बेरोजगारांना काहीही धोका नाही. मात्र कोचिंग क्लासेस एका शहरात व संबंधित विद्यार्थ्याचे कनिष्ठ महाविद्यालय दुसऱ्या शहरात, असाही प्रकार जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरू आहे. संबंधित महाविद्यालय व कोचिंग क्लासेसमध्ये सामंजस्य करार झाल्यामुळेच हा प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे. असा सामंजस्य करार करणाºया संबंधित कोचिंग क्लास व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालये बायोमेट्रिकच्या निर्णयाने धोक्यात येणार आहेत.

Web Title: Due to the use of biometric force of schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा