वाघिणीमुळे अभयारण्यातील गावांमध्ये पसरली दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 12:03 AM2017-09-04T00:03:21+5:302017-09-04T00:08:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : आरमोरी व देसाईगंज तालुक्यात धुमाकूळ घालणाºया वाघिणीला २९ आॅगस्ट रोजी चपराळा अभयारण्यात सोडण्यात आले. त्यामुळे अभयारण्यात असलेल्या मार्र्कंडा (कं.), धन्नुर, चौडमपल्ली, चंदनखेडी, चपराळा, सिंघनपल्ली या गावांतील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शासनाने चपराळा अभयारण्य १९८६ मध्ये घोषीत केले. या अभयारण्याची सीमा १३४ चौरस किमीपर्यंत पसरली आहे. या अभयारण्यात वाघ नसल्याने हरीण, सांबर, चितळ यासारख्या तृणभक्षी प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शासनाने अभयारण्य घोषीत केले. मात्र या अंतर्गत येणाºया गावांचे पुनर्वसन केले नाही. त्यामुळे चपराळा, धन्नुर, मार्र्कंडा कं., सिंगमपल्ली, चौडमपल्ली ही गावे अजुनही अभयारण्याच्या परिसरातच आहेत. आजपर्यंत या ठिकाणी वाघ, बिबट यासारखा हिंस्त्रप्राणी नसल्याने अभयारण्यात असूनही स्थानिक नागरिकांची कोणतीही तक्रार नव्हती. आता मात्र या अभयारण्यात नरभक्षक असल्याचा संशय असलेली वाघिण सोडण्यात आली आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. जंगलामध्ये शिकारीसाठी असंख्य प्राणी आहेत. जंगलातच पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत वाघ रस्त्यांवर किंवा गावात येणार नाही, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाºयांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
चपराळा अभयारण्यात येणाºया सहाही गावांमध्ये वन विभागामार्फत दवंडी दिली आहे. नागरिकांनी आपली जनावरे जंगलात सोडू नये व नागरिकांनी जंगलातही जाऊ नये. वाघिणीला कॉलर आयडी लावण्यात आला आहे. या माध्यमातून वाघिणीच्या हालचालींवर नियंत्रण राहणार आहे.
- डी. व्ही. कैलुके, वन परिक्षेत्राधिकारी, वन्यजीव कार्यालय चौडमपल्ली
उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर
सद्य:स्थितीत चपराळा अभयारण्यात पाणी व प्राणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे पावसाळा व हिवाळाभर वाघिणीला कोणतीच समस्या जाणवणार नाही. मात्र उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवणार आहे. झुडूपे नसल्याने शिकार करण्यासही अडचण निर्माण होणार आहे. या अगोदर या अभयारण्यात दोन वाघ सोडण्यात आले होते. मात्र पाण्याच्या टंचाईमुळे वाघांनी पळ काढला होता.