महाशिवरात्री यात्रेत कर्तव्य बजावताना चक्कर आली, सहकारी धावले पण...
By संजय तिपाले | Published: March 8, 2024 09:20 PM2024-03-08T21:20:04+5:302024-03-08T21:20:24+5:30
सहायक फौजदाराचा हृदयविकाराचे मृत्यू: चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथील घटना
गडचिरोली: चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथे महाशिवरात्री निमित्त यात्रेत बंदाेबस्त करताना सहायक उपनिरीक्षकांना अचानक भोवळ आली. त्यानंतर क्षणार्धात ते जमिनीवर कोसळले, सहकारी मदतीला धावले, तातडीने दवाखाना जवळ केला, पण दुर्दैवाने त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. ८ मार्चला दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली.
भैय्याजी पत्रू नैताम (५२,रा. कोपरल्ली ता. मुलचेरा) असे मयत सहायक उपनिरीक्षकांचे नाव आहे. ते राजारामा खांदला (ता.अहेरी) येथे ते नियुक्तीवर होते. महाशिवरात्रीनिमित्त चपराळा येथे मोठा यात्रोत्सव असतो. शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग असते. त्यामुळे बंदोबस्तकामी भैय्याजी नैताम यांना पाठविण्यात आले होते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर ते कर्तव्य बजावत होते. दुपारी साडेचार वाजता अचानक भोवळ आली व ते कोसळले. सहकाऱ्यांनी त्यांना त्वरित आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले . मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याच्या प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. आष्टी ठाण्याचे पो.नि. विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
कुटुंबास धक्का
या घटनेची माहिती कुटुंबाला दिल्यानंतर त्यांना धक्का बसला. आष्टी ग्रामीण रुग्णालयात कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कोपरल्ली येथे मूळ गावी अंत्यविधीसाठी पाठविण्यात आला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.