नवरात्रोत्सवात जोडीने दर्शनाला, वाटेत अभियंत्यावर काळाचा घाला
By संजय तिपाले | Published: October 20, 2023 04:45 PM2023-10-20T16:45:16+5:302023-10-20T16:45:25+5:30
पत्नी जखमी: लग्नानंतर सातव्या महिन्यातच हिरावला पती, चंद्रपूर जिल्ह्यात अपघात
गडचिरोली : नवरात्रीेत्सवाच्या निमित्ताने जोडपे दर्शनाला गेले, चंद्रपूरच्या महाकालीचे दर्शन घेऊन परतताना चंद्रपूर जिल्ह्यात अपघात झाला. यात अभियंता असलेला पती जागीच ठार झाला तर पत्नी गंभीर जखमी आहे. १९ ऑक्टोबरला रात्री ही घटना घडली.
प्रमोद देवराव जयपूरकर (२७,रा.आष्टी ता.चामोर्शी) असे मयताचे नाव असून पत्नी प्रणाली प्रमोद जयपूरकर (२३) जखमी आहेत. प्रमोद हे गडचिरोलीत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभागात स्थापत्य अभियंता म्हणून कार्यरत होते. पत्नी प्रणालीसमवेत ते १९ रोजी चंद्रपूर येथे महाकाली देवीच्या दर्शनाला दुचाकीवरुन (एमएच ३३ यू- ३६०८) होते. दर्शन घेतल्यावर परतताना उशीर झाला. रात्री साडेनऊ वाजता चंद्रपूरच्या सावलीजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली, यात प्रमोद जयपूरकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्त्राव होऊन जागीच ठार झाले.पत्नी प्रणाली यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे, त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरु आहेत.
अर्ध्यावरती डाव मोडला...
दरम्यान, प्रमोद यांचा तेलंगणातील प्रणालीशी मार्च २०२३ मध्ये विवाह झाला होता. लग्नाला अवघे सात महिने झाले होते. दोघांनी सुखी संसाराची स्वप्ने पाहिली होती, पण अपघाताने प्रमोद यांना हिरावून घेतले, त्यामुळे प्रणाली यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.