ई-पीक पेरा नोंदणी तलाठ्यामार्फत करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:43 AM2021-09-17T04:43:40+5:302021-09-17T04:43:40+5:30
कोरची : राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतीची पीक पेरा ...
कोरची : राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतीची पीक पेरा नोंदणी करण्याकरिता ई-पीक पेरा हे ऑनलाईन ॲप्लिकेशन विकसित केले आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन शेतीच्या पीक पेऱ्याबाबत ऑनलाईन नोंदणी करायची आहे. ही नोंदणी स्वतः शेतकऱ्यांनीच करायची आहे. ही प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. त्यामुळे ई-पीक पेरा नाेंदणी तलाठ्यांमार्फत करण्यात यावी, अशी मागणी तालुका सरपंच संघटनेने केली आहे.
तालुक्यातील शेतकरी अशिक्षित असून, आर्थिकदृष्टया सक्षम नाही. त्यांना स्मार्टफोन खरेदी करणे परवडणारे नाही. शेतकरी अशिक्षित असल्याकारणाने त्यांना स्मार्टफोनवर पीक पेरा नोंदणी करणे शक्य नाही. कोरची तालुका हा अतिदुर्गम भाग असल्यामुळे येथे इंटरनेटची सक्षम सुविधा नाही. याठिकाणी साधे फोनसुद्धा लागत नाहीत तर ऑनलाईन पीक पेरा नोंदणी करणे अतिशय कठीण आहे.
शासनाने संबंधित ॲप्लिकेशन हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू केल्यामुळे सर्व्हर बरेचदा डाऊन असतो. त्यामुळे ऑनलाईन पीक पेरा नोंदणी करणे शेतकऱ्यांना शक्यच नाही. त्यामुळे ई-पीक पेरा नोंदणी ही शासनाच्या कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात यावी, जेणेकरून शेतकरी या लाभापासून वंचित राहू नये व शेतीचा पीक पेरा योग्यरित्या नोंदणी करून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी उपाययोजना करण्यात यावी, असेही संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन कोरची तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष धनिराम हिडामी, सचिव दिलीप केरामी, कार्याध्यक्ष चेतानंद किरसान, कोषाध्यक्ष विरेंद्रकुमार जांभूळकर, संघटक सुनील सयाम, सदस्य रमेश तुलावी, मोहन कुरचाम, सल्लागार राजेश नैताम यांनी दिले. तहसीलदार सी. आर. भंडारी यांच्यामार्फत गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन पाठविण्यात आले.