कमाईचे पैसे लॉकडाऊनमध्ये संपले, आता करायचे? गडचिरोलीतील कष्टकऱ्यांची व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 01:10 PM2020-05-04T13:10:34+5:302020-05-04T13:10:58+5:30
आतापर्यंत मजुरीतून कमावलेले पैसे लॉकडाऊनमध्ये संपले. आता गावी जाण्यासाठीही पैसे नाहीत अशी व्यथा मुलचेरा तालुक्यातील लगाम येथील शाळेत क्वारंटाईन केलेल्या १७ मजुरांनी व्यक्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: आतापर्यंत मजुरीतून कमावलेले पैसे लॉकडाऊनमध्ये संपले. आता गावी जाण्यासाठीही पैसे नाहीत अशी व्यथा मुलचेरा तालुक्यातील लगाम येथील शाळेत क्वारंटाईन केलेल्या १७ मजुरांनी व्यक्त केली आहे. तेलंगणा राज्यातील खम्मम जिल्ह्यातील भद्रीतांडा येथे दोन महिन्याआधी लगाम येथील मजुर मिरची तोडायला गेले होते. तिथे गेल्यानंतर तीन दिवसानंतर लॉकडाऊन झाले. तरी पण गावाच्या बाहेर शेतात काही दिवस काम केले. प्रत्येक मजुरांनी जवळपास सहा हजार रुपये कमावले मात्र, एक महिना रिकामे बसून होते. गावाकडे येण्यासाठी शेतमालकने ट्रक करून दिला. भाडे मात्र मजुरांनी दिले 13 तास सिरपूर (कागजनगर) पर्यंत 67 मजुरांनी प्रवास केला. शिरपुर पासून 30 कि.मी. पायी चालत मजुरांनी कवटाला गाठले. या मजुरांमध्ये 36 मजुर चंद्रपूर जिल्ह्यातील होते. कवटाला पोलिसांनी गाडी करून दिली दिली. भुरेपल्ली पर्यंत 24 लगामच्या मजुरांचा प्रवास झाला. नंतर नदीमध्ये स्वयंपाक करून पायी लगामला आले. यात चुटुगुंटा येथील पाच मजुर, काकरगट्टा येथील दोन मजुर होते. ते आपआपल्या गावी शाळेत क्वारंटाइन झाले आहेत. लगाम येथील राजे धर्मराव शाळेत 9 महिला व 8 पुरुष असे एकूण 17 मजुर गेल्या दोन दिवसापासून आहेत. लगाम ग्रामपंचायततर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून साबण, बिस्किट पुडे, सहा मास्क देण्यात आले. विशेष म्हणजे आरोग्य विभागतर्फे एकाही मजुरांची तपासणी करण्यात आलेली नाही. हातावर शिक्के मारून क्वारंटाइन केल्यामुळे या मजुरांना भाजीपाला किंवा किराणा सामान घेण्यासाठी बाहेर जाता येत नाही .त्यामुळे प्रशासनाने व्यवस्था करावी अशी मागणी या मजुरांनी केली आहे.