जिल्हाभरातील अर्थचक्र पुन्हा थांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 05:00 AM2021-04-11T05:00:00+5:302021-04-11T05:00:28+5:30
लाॅकडाऊन असल्याने प्रवासी मिळणार नाही, असा अंदाज बांधून एसटी प्रशासनाने बसचेे शेड्यूल्ड कमी करण्याच्या दृष्टीने अगाेदरच नियाेजन केले हाेते. ग्रामीण भागातील संपूर्ण बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. चंद्रपूर, नागपूर, अहेरी मार्गावर काही बसफेऱ्या साेडण्यात आल्या. चंद्रपूरला जाणारे बरेच प्रवासी मिळाल्याने चंद्रपूरसाठी काही बसफेऱ्या साेडल्या. ग्रामीण भागातील काही प्रवासी बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करीत हाेते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी शासनाने शनिवारी व रविवारी कडक लाॅकडाऊन लागू केले आहे. त्याचे पालन करीत जिल्हाभरातील बाजारपेठ शनिवारी बंद ठेवण्यात आली. शासकीय कार्यालये, बॅंकाना असलेली सुटी यामुळे नागरिकही घराच्या बाहेर पडले नाही. त्यामुळे गडचिराेलीसह तालुकास्तरावरील रस्त्यांवरील वाहने व नागरिकांची वर्दळ थांबली हाेती. अधूनमधून एखादेच वाहन रस्त्यावर दिसत हाेते.
एसटीचे १५ टक्केच शेड्यूल्ड सुटले
लाॅकडाऊन असल्याने प्रवासी मिळणार नाही, असा अंदाज बांधून एसटी प्रशासनाने बसचेे शेड्यूल्ड कमी करण्याच्या दृष्टीने अगाेदरच नियाेजन केले हाेते. ग्रामीण भागातील संपूर्ण बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. चंद्रपूर, नागपूर, अहेरी मार्गावर काही बसफेऱ्या साेडण्यात आल्या. चंद्रपूरला जाणारे बरेच प्रवासी मिळाल्याने चंद्रपूरसाठी काही बसफेऱ्या साेडल्या. ग्रामीण भागातील काही प्रवासी बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करीत हाेते. मात्र ग्रामीण भागातील मार्गांवर बसफेऱ्या साेडण्यात आल्या नाहीत. तसेच खासगी वाहतूकही बंद असल्याने या प्रवाशांची चांगलीच गाेची झाली.
भामरागड
भामगरागड शहरातील भाजीपाला, मेडिकल, काेल्ड्रिंक दुकाने व पेट्राेल पंप वगळता, इतर सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली हाेती. भामरागडच्या सभाेवताल असलेल्या गावांमध्येही लाॅकडाऊनचे पालन करण्यात आले. दुर्गम भागातील गावांमध्ये दुकानांसह सर्वच व्यवहार सुरळीत सुरू हाेते. लाॅकडाऊनचा फारसा प्रभाव या गावांमध्ये दिसून आला नाही.
चामाेर्शी
चामाेर्शी शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद हाेती. बहुतांश ग्रामीण भागातील दुकानेही बंद ठेवण्यात आली हाेती. बाजारपेठ व शासकीय कार्यालये बंद असल्याने, ग्रामीण भागातील नागरिक चामाेर्शी शहराकडे फिरकले नाहीत. त्यामुळे दिवसभर रस्ते ओस पडले हाेते. एखादे वाहन रस्त्याने फिरकत असल्याचे दिसून येत हाेते.
आष्टी
शनिवारी आष्टी येथील चहा टपरी, पानठेले, जनरल स्टोअर, कापड दुकाने, सराफा दुकाने, सिमेंट, लोहा आदी दुकाने पूर्ण बंद होती. फक्त दवाखाना व मेडिकल सुरू होते. रस्त्यावर नागरिकांची गर्दीही कमी होती. आंबेडकर चौकात पोलीस तैनात होते. कामाशिवाय फिरणाऱ्या व मास्क न लावलेल्या लोकांना पोलीस अडवून विचारपूस करीत होते. शुक्रवारी मास्क न लावलेल्या वाहनधारकांकडून दंड वसूल करण्यात आला. त्यामुळे आज नागरिकांची वर्दळ कमी दिसत होती. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेले नियम पोलीस विभागाकडून राबविले जात आहे. पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड हे सुद्धा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात फिरत असून, परिस्थितीचा आढावा घेत आहेत.