बांबूच्या झाल्या भिंती, अन् ताडीचे झाड झाले फळा; निसर्गाच्या साथीने बहरले शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2022 10:52 AM2022-09-21T10:52:36+5:302022-09-21T11:03:37+5:30

गडचिरोलीच्या अतिदुर्गम गावात शिक्षकाच्या कल्पकतेतून शिक्षणाचे धडे

Education lessons for students through the imagination of a teacher in a remote village of Gadchiroli | बांबूच्या झाल्या भिंती, अन् ताडीचे झाड झाले फळा; निसर्गाच्या साथीने बहरले शिक्षण

बांबूच्या झाल्या भिंती, अन् ताडीचे झाड झाले फळा; निसर्गाच्या साथीने बहरले शिक्षण

Next

रवी रामगुंडेवार

एटापल्ली (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यात काही शाळांच्या इमारती अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना बसण्यायोग्य राहिलेल्या नाहीत. अशा जीर्णावस्थेतील धोकादायक इमारतींपासून विद्यार्थ्यांना दूर ठेवून निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षणाचे धडे गिरवण्याचा नावीन्यपूर्ण प्रयोग या तालुक्यातील वाळवी या गावात सुरू आहे. त्यासाठी बांबूपासून बनविलेल्या भिंती आणि ताडीच्या झाडाच्या बुंध्याचा फळ्यासारखा वापर करून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आटापिटा केला जात आहे.

गट्टा केंद्रांतर्गत वाळवी या दुर्गम गावात जिल्हा परिषदेची एकशिक्षकीशाळा आहे. या छोट्या गावात आदिवासींमधील माडिया जमातीचे जेमतेम ३० ते ४० कुटुंबं वास्तव्यास आहेत. चारही बाजुंनी घनदाट जंगल, गावात जायचे असल्यास पायवाटेने जाण्याशिवाय पर्याय नाही. पावसाळ्यात तर वाटेत पडणाऱ्या नाल्यांच्या पाण्यातून वाट काढत या गावात पोहोचणे म्हणजे जिवाची कसरतच. अशातही वाळवी गावात जिल्हा परिषदेची वर्ग १ ते ४ पर्यंतची शाळा भरते. पण भौतिक सुविधा नसतानाही शिक्षक, गावकऱ्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून अडचणींवर मात केली आहे.

जीर्ण इमारतीवर शोधला पर्याय

शाळेची इमारत अत्यंत धोकादायक. पावसाचे पाणी गळणारी, कधीही उन्मळून पडेल याचा नेम नसणाऱ्या भिंती आणि छत. त्यामुळे अशा इमारतीत विद्यार्थ्यांना घेऊन वर्ग भरविणे जिकिरीचे असल्याचे ओळखून वाळवीचे ग्रामस्थ आणि मुख्याध्यापक श्रीकांत काटेलवार यांनी गावातील ‘गोटूल’मध्ये शाळा भरविण्याचे ठरविले. गावातील सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचे हे छोटेसे समाजभवन म्हणजेच गोटुल. पण ते सुद्धा व्यवस्थित नव्हते. मग गावातल्या प्रत्येक कुटुंबातील सदस्याने सहभाग देत गोटूलरुपी भवनाला सजवून शाळेचे रूप दिले.

शाळेचे नवीन रूप भावले

ताडीच्या झाडांपासून तयार केलेली वैविध्यपूर्ण, विनाखर्चाची पण टिकाऊ शैक्षणिक साधने गोटूलमध्ये लावण्यात आली. शब्दांचे झाड, स्मृतिशेष फलक गोटूलची शोभा वाढविण्याबरोबर विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य वाढवितात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिक्षक श्रीकांत काटेलवार सातत्याने प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे ही मिनी शाळा पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरत आहे.

मुलांचे स्थलांतर थांबविले

सुरुवातीला या गावातील शाळेची पटसंख्या केवळ १ होती. आज १० विद्यार्थी गोटूलमध्ये बोलीभाषेतून आनंददायी शिक्षण घेत आहेत. आदिवासीची बोलीभाषा माडिया ही त्यांच्या शिक्षणात मोठी अडचण होती. जंगलात भिरभिरणारी ही मुले एका जागी स्थिर बसणारी नाहीत, हे शिक्षकांनी जाणून स्थानिक माडिया बोलीभाषेतून अध्यापन सुरू केले. सर्वप्रथम माडिया भाषेतून शिकवून नंतर मराठी भाषेकडे नेण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला. बालभारतीची पाठ्यपुस्तके आणि माडिया भाषेतील उच्चारातील अंकलिपीची निर्मिती केंद्रातील दोन शिक्षकांनी मिळून तयार केली, त्याचाही वापर फलदायी ठरत आहे.

Web Title: Education lessons for students through the imagination of a teacher in a remote village of Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.