निमगावात खेळताबागळताना सुरू आहे शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 05:00 AM2020-08-26T05:00:00+5:302020-08-26T05:00:40+5:30
शैक्षणिक सत्र सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अजूनपर्यंत शाळा सुरू झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवावे, असे निर्देश शासनामार्फत देण्यात आले आहेत. मात्र ग्रामीण भागातील पालकांकडे स्मार्ट फोन उपलब्ध नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण ही संकल्पना जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी राबविणे कठीण आहे. विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : लॉकडाऊनमुळे शाळा बंद असतानाही गावात शैक्षणिक वातावरण तयार व्हावे, तसेच विद्यार्थ्यांना खेळताबागळताना शिकता यावे, यासाठी येथील जिल्हा परिषद शाळेने गावातील मुख्य चौकात तसेच महत्त्वाच्या ठिकाणी शिक्षणाशी संबंधित ७० बॅनर लावले आहेत. या नावीण्यपूर्ण उपक्रमाची पालकांकडून प्रशंसा होत आहे.
शैक्षणिक सत्र सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अजूनपर्यंत शाळा सुरू झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवावे, असे निर्देश शासनामार्फत देण्यात आले आहेत. मात्र ग्रामीण भागातील पालकांकडे स्मार्ट फोन उपलब्ध नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण ही संकल्पना जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी राबविणे कठीण आहे. विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली आहेत. मात्र शाळा सुरू नसल्याने स्वत: पुढाकार घेऊन विद्यार्थी अभ्यास करत नाही.
शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे, शाळेत शिक्षक येत आहेत. मात्र विद्यार्थी शाळेत येत नसल्याने उन्हाळ्याच्या सुट्यांप्रमाणे विद्यार्थी अभ्यास करीत नाही. गावात शैक्षणिक वातावरण तयार केल्यास विद्यार्थी थोड्याफार प्रमाणात शिकतील, ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक देवेंद्र लांजेवार यांनी पहिली ते सातवीपर्यंतच्या अभ्यासक्रमाशी संबंधित दोन बाय तीन फुटाचे सुमारे ७० बॅनर स्व:खर्चाने तयार करून ते गावातील मुख्य चौक, दर्शनी भागावरील घराची भिंत, मंदिर, मुलांची खेळण्याची जागा या ठिकाणी लावले आहेत. त्यामुळे विद्यार्थी बाहेर खेळताना, चौकात एखाद्या ठिकाणी बसले असताना बॅनर दिसून येत आहेत. खेळतानाच बॅनरवरील मजकूर वाचत असल्याने त्या माध्यमातून त्यांचे अध्ययन होत आहे. तसेच गावात विविध ठिकाणी बॅनर लागले असल्याने गावात शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे. बॅनर बघून पालकही विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी आग्रह धरत आहेत.
शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी अशाप्रकारचा नावीण्यपूर्ण उपक्रम राबविणारी निमगाव जिल्हा परिषद शाळा ही जिल्ह्यातील एकमेव शाळा आहे. अशा प्रकारचे नावीण्यपूर्ण उपक्रम इतरही शाळांनी राबविण्याची गरज आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
पहिल्या टप्प्यात ७० बॅनर लावले आहेत. बॅनर लावण्यासाठी उपक्रमशील शिक्षक देवेंद्र लांजेवार यांना शिक्षिका वर्षा नाकाडे, संतोष कोल्हे यांनी मदत केली.
बॅनरवर या अभ्यासक्रमांचा आहे समावेश
मुळाक्षरे, साधे शब्द, चौदाखडी, इंग्रजीचे साधे शब्द, गार्डन ऑफ वर्ड, गणिताचे सुत्र, गणिताचे नियम, विविध प्रकारचे नकाशे, बे-एकचे पाडे, जोडाक्षरे, एकाच शब्दाचे विविध अर्थ, व्याकरणाचे नियम, विविध कसोट्या, इंग्रजीचे छोटे वाक्य, शब्दांचा डोंगर, म्हणी व वाक्यप्रचार, समानार्थी शब्द, विरूद्धार्थी शब्द, अनेक शब्दांबद्दल एकच शब्द, भौमिती आकार आदी अभ्यासक्रमाचा समावेश असलेले बॅनर लावले आहेत. गावातील एखादा सुशिक्षित व्यक्ती रस्त्यावरून जाणाऱ्या विद्यार्थ्याला थांबवून बॅनरवरची माहिती विचारते किंवा वाचायला लावत आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या विद्यार्थ्यांचे अध्ययन होत आहे, अशी माहिती देवेंद्र लांजेवार यांनी दिली.