शिक्षण सेवक भरती परीक्षा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 10:28 PM2017-11-04T22:28:42+5:302017-11-04T22:31:17+5:30
प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवक पदासाठी ‘अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०१७’ या परीक्षेसाठी महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेने इच्छुक व पात्र उमेदवारांकडून.....
दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवक पदासाठी ‘अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०१७’ या परीक्षेसाठी महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेने इच्छुक व पात्र उमेदवारांकडून २ नोव्हेंबरपासून आॅनलाईन अर्ज मागविले आहेत. १२ ते २१ डिसेंबर या कालावधीत आॅनलाईन परीक्षा होणार आहे. तब्बल सात वर्षांनी शिक्षण सेवक भरतीसाठी ही परीक्षा होत आहे.
शिक्षण सेवक भरतीसाठी यापूर्वी सन २०१० मध्ये राज्यस्तरावरून सीईटी झाली होती. त्यानंतर शिक्षण सेवक भरतीसाठी परीक्षा झालेली नाही. शासनामार्फत आता शिक्षण सेवक भरतीसाठी सीईटीऐवजी अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा घेतली जात आहे. परीक्षेसाठी आॅनलाईन अर्ज भरताना परीक्षार्थ्यांनी दहावी, बारावी, डीटीएड, पदवी, पदव्यूत्तर इत्यादी शैक्षणिक माहिती तसेच दिव्यांगत्व, राखीव प्रवर्गाचे असल्यास जात इत्यादी बाबीची माहिती मूळ प्रमाणपत्रावरीलच भरावी, असे नमूद करण्यात आले आहे.
सदर परीक्षा देऊ इच्छीणाºया उमेदवारांची सर्व संपर्क आॅनलाईन, एसएमएसद्वारे होऊ शकणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी स्वत:चा भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी अचूक देण्याची आवश्यकता आहे. आॅनलाईन अर्जासोबत कोणत्याही कागदपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. शिक्षण सेवक परीक्षा गडचिरोलीसह सर्व जिल्हा मुख्यालयी आयोजित करण्यात येणार आहे, असे महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी शासनाच्या संकेतस्थळावरील जाहिरातीत नमूद केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात शिक्षक पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता हजारो विद्यार्थ्यांनी प्राप्त केली आहे. मात्र पदभरती होत नसल्याने हे उमेदवार प्रतीक्षेत होते. आता टीईटी उत्तीर्ण उमेदवारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
असा आहे परीक्षेचा अभ्यासक्रम व आराखडा
शिक्षण सेवक निवडीसाठी होणाºया शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता परीक्षा एकूण २०० गुणांची राहणार असून यात दोन घटकांवर भर देण्यात येणार आहे. अभियोग्यता व बुद्धीमत्ता हे दोन घटक असून अभियोग्यतेवर १२० व बुद्धीमत्तेवर ८० गुण राहणार आहे. २०० गुणांसाठी २०० गुण राहणार असून यामध्ये अभियोग्यतेवर शेकडा प्रमाण ६० टक्के आणि बुद्धीमत्तेवर ४० टक्के भर राहणार आहे. सदर परीक्षा आॅनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून वस्तूनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची राहणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना दोन तासाचा वेळ देण्यात येणार आहे.
टीईटी उत्तीर्ण उमेदवारच परीक्षेसाठी पात्र
इयत्ता पहिली ते आठवीमधील शिक्षक पदाकरिता महाराष्टÑ खासगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मध्ये विहीत केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आवश्यक आहे. तसेच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवारच सदर अभियोग्यता चाचणीकरिता पात्र राहणार आहेत. इयत्ता नववी ते बारावीमधील शिक्षक पदासाठीही टीईटी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारच ही परीक्षा देऊ शकणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सदर परीक्षेला बसणाºया उमेदवारांची संख्या मर्यादितच राहण्याची शक्यता आहे.
शिक्षण सेवक भरतीसाठी राज्यस्तरावरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातही या परीक्षेचे केंद्र राहण्याची शक्यता आहे. परीक्षेसाठी आवेदनपत्र सादर केलेल्या उमेदवारांच्या संख्येवर परीक्षा केंद्र ठरेल.
- शरदचंद्र पाटील, प्राचार्य, जिल्हा शैक्षणिक सातत्य पूर्ण व्यवसाय विकास संस्था, गडचिरोली